कोल्हापूर : जुन्या कृष्णधवल टीव्हीच्या व्हॉल्व्हमधील चिपची किंमत लाखो रुपये असल्याची अफवा कोल्हापुरात सोशल मीडियावरून पसरली आहे. त्यामुळे अनेकांनी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे दुरुस्ती दुकाने व भंगार विक्रेत्यांकडे फोन व प्रत्यक्ष भेटीद्वारे जुन्या टीव्हीची चौकशी सुरू केली आहे.काही वर्षांपूर्वी लाकडी शटर असलेले कृष्णधवल दूरचित्रवाणी संच पाहण्यास मिळत होते. त्यांमध्ये रेडिओमध्ये असलेले व्हॉल्व्ह बसविण्यात आले होते. त्यानंतर व्हॉल्व्ह व ट्रान्झिस्टर यांचा संयुक्त पार्ट आला. ट्रान्झिस्टरचे रूपांतरही छोट्या आयसीमध्ये झाले. या रूपांतरांना ३० वर्षे लोटली. विस्मृतीत गेलेल्या या टीव्हीतील व्हॉल्व्हमधील चिपमुळे तो पुन्हा चर्चेत आला.ही चिप म्हणे कोणी लाखो, तर कोणी कोटी रुपयांना खरेदी करते अशी अफवा सोशल मीडियावरून पसरली. चिप मिळविण्यासाठी अनेकांनी भंगार विक्रेत्यांचे फोन क्रमांक शोधून, तर काहींनी प्रत्यक्ष त्यांची भेट घेऊन हा टीव्ही असेल तर द्या आणि हवी ती किंमत घ्या, अशी ऑफरही सुरू केली आहे.व्हॉल्व्हमधील चिप म्हणजे स्टीलची पट्टी असून आत मर्क्युरी आहे. त्याची किंमत अत्यल्प आहे. मात्र, हे इलेक्ट्रॉनिक्स पार्टचे उत्पादन बाजारात मागणी नसल्याने २५ वर्षांपूर्वीच बंद झाले आहे. सोने, चांदी हे चांगले वीजवाहक आहेत. त्यांचा वापर अत्यंत सूक्ष्मरीत्या काही इलेक्ट्रॉनिक्स पार्टमध्ये थर देण्यासाठी करतात.जुन्या कृष्णधवल टीव्हीमध्ये अशा प्रकारचा कोणताही पार्ट नाही; त्यामुळे या केवळ अफवा आहेत. अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी.- अनिल धडाम, अध्यक्ष, कोल्हापूर इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन
'ती' अफवा पसरली अन् कोल्हापूरकर शोधू लागले ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 2:40 AM