उद्धव गोडसे कोल्हापूर : मांडरे (ता. करवीर) येथील विषबाधा प्रकरणात तिघांनी जीव गमावला, तर एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे. विषबाधेच्या घटनेला महिना पूर्ण झाला, तरी अजूनही याचा उलगडा झालेला नाही. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्याशिवाय तपास पुढे सरकणार नसल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.मात्र, विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होत नसल्याने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. नजरचुकीने झालेली विषबाधा की जाणीवपूर्वक केलेला विषप्रयोग असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. घटना आणि तपासाच्या पातळीवर अनेक प्रश्न अनुत्तरीत असल्याने याचे गूढ वाढले आहे.जबाबात विसंगती का?पांडुरंग पाटील यांच्यासह त्यांच्या तीन मुलांनी मुंगूस चावून दगावलेली कोंबडी शिजवून खाल्ल्याचे निमित्त झाले आणि त्यांच्यासह दोन मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. १५ नोव्हेंबरला विषबाधेची घटना घडल्यानंतर १५ दिवसांत तिघांचा बळी गेला. त्यानंतर करवीर पोलिसांनी पाटील यांची सून गंगा आणि बचावलेला लहान मुलगा प्रदीप यांचे जबाब नोंदवले. मात्र, दोघांच्या जबाबात विसंगती येत आहे. विषबाधा झाल्याच्या दिवशी घरात कूकरमध्ये भात शिजवल्याचे गंगा यांनी सांगितले, तर शिट्टी खराब झाल्याने कूकर बंद असून वहिनीने पातेल्यात भात शिजवला होता, असा जबाब प्रदीपने दिला आहे.
मृतांचे कपडे का जाळले?विषबाधा झाल्यानंतर रुग्णांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांनी उलट्या केल्यानंतर कपड्यांवर त्याचे अंश पडले होते. रुग्णालयातून माहिती मिळताच पोलिसांनी कपडे जप्त करणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. मृतदेहांचे दहन करतानाच नातेवाइकांनी मृतांचे कपडे जाळून टाकले. कपडे जाळण्यास कोणी पुढाकार घेतला? तपासासाठी ते पोलिसांच्या ताब्यात का दिले नाहीत? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.विष चिकनच्या रश्श्यात की भातात?पहिल्या दिवशी जेवलेले पांडुरंग पाटील यांच्यासह दोन मुले कृष्णात आणि रोहित यांना विषबाधा झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेवलेला लहान मुलगा प्रदीप यालाही विषबाधा झाली. दोन्ही दिवसांत घरात जेवलेल्या गंगा आणि त्यांच्या पाच वर्षीय मुलीला काहीच झाले नाही. दरम्यान, पहिल्या दिवशी एका शेजाऱ्यानेही तेच चिकन खाल्ले होते. त्यांनाही काही झाले नाही. त्यामुळे विष नेमके चिकनमध्ये होते की भातात होते? याचा उलगडा होणे गरजेचे आहे.
नेमके कोणते विष?मृतांच्या पोटातील काही अंश तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहेत. त्यांना कोणत्या विषाची बाधा झाली? याचा उलगडा फॉरेन्सिकच्या अहवालावरून होईल. दरम्यान, पाटील यांच्या घरात पोलिसांना तणनाशकाची बाटली मिळाली आहे. त्याच तणनाशकाचे अंश मृतांच्या पोटात मिळाल्यास विषप्रयोग झाल्याच्या संशयाला बळकटी मिळणार आहे. मात्र, विषप्रयोग कोणी आणि का केला? याचाही उलगडा पोलिसांना करावा लागेल.