समीर देशपांडेकोल्हापूर ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचे नियोजन अंतिम टप्प्यात आले असताना प्रशासकीय अधिकारी वेगळ्याच तणावात आहेत. एकीकडे घराघरावर ध्वज फडकवायचा आहे. परंतु तो शासकीय नियमानुसार असला पाहिजे. त्यामुळे घाई गडबडीत तयार केलेले नियमबाह्य ध्वज पुरवले जाऊ नयेत यासाठी प्रशासनाला डोळ्यात तेल घालून ध्वजांची तपासणी करावी लागत आहे.केंद्र शासनाने ‘हर घर तिरंगा’ची घोषणा गेल्या महिन्यात केल्यानंतर त्या दृष्टीने नियोजनासाठी बैठकांवर बैठकांचा सपाटा लावण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हा पोलीस प्रमुख या चार महत्त्वाच्या प्रशासकीय यंत्रणांचे स्वतंत्र नियोजन सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांना याबाबत जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु एवढ्या मोठ्या संख्येने ध्वज मिळवताना प्रशासनाची दमछाक होत आहे.जिल्हा प्रशासनाने पाच लाख ध्वजांची मागणीजिल्हा प्रशासनाने एकूण पाच लाख ध्वजांची मागणी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे केली होती. त्यापैकी सोमवार अखेर ४ लाख ५ हजार ध्वज जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले असून ते ११ तालुक्यांकडे रवाना करण्यात आले आहेत. मंगळवारी आणखी एक लाख ध्वज उपलब्ध होणार आहेत. पाच साखर कारखान्यांनी ध्वज मागणी केली असून त्या त्या तालुक्यात ते पोहाच करण्यात आले आहेत.मागणी वाढल्यामुळे टंचाईसर्वच देशभरातून एकाचवेळी ध्वजांची मागणी वाढल्यामुळे मोठी टंचाई निर्माण झाली आहे. इचलकरंजीमध्येही अशा पध्दतीने ध्वज निर्मितीवर मर्यादा आल्या आहेत. तर कोल्हापूरसाठी सांगलीमध्ये ध्वज तयार करण्याचे काम वेगावले आहे. परंतु हे करत असताना खराब ध्वज येण्याचे प्रमाणही अधिक आहे.
नीट न कापलेले, काही ठिकाणी फाटलेलेपहिल्या टप्प्यात ग्रामपंचायत विभागाकडे ६० हजार ध्वज मिळाले होते. परंतु यातील अनेक ध्वज हे संहितेनुसार नव्हते. काही ध्वज खालच्या बाजूला फाटलेले होते. काही ध्वजांचा रंग एकमेकांमध्ये मिसळला होता. टीप उसवली होती. तीनही बाजूंनी शिलाई आवश्यक असताना ते मारली गेली नव्हती. काही ध्वज चुकीच्या पध्दतीने कापण्यात आले आहेत.
तालुका पातळीवर तपासणीचे काम
जिल्हा पातळीवर लाखो ध्वज तपासणीचे काम शक्य नसल्याने त्या त्या तालुक्यांमध्ये सर्व ध्वज तपासून वितरित करावे अशी सूचना सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी बारा तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये संहितेनुसारच असलेल्या ध्वजांचे वितरण करा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.