कोल्हापूर : सर्वसामान्य मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी आमचा रास्ता रोको आहे. कोणत्याही प्रकारच्या सरकारविरोधी घोषणा किंवा पुतळा जाळला जाणार नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या आंदोलनाला परवानगी नाकारू नये. प्रशासनाने जरी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले तरी आम्ही आज, मंगळवारी सकाळी ११ वाजता ताराराणी चौकात रास्तारोको आंदोलन करणारच, अशी ठाम भूमिका सकल मराठा समाजाने सोमवारी घेतली. जिल्ह्यात प्रतिबंधित आदेश असल्यामुळे आंदोलनास परवानगी दिली जाणार नाही. आंदोलन करू नये, यासाठी शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी शिवाजी मंदिरात सकल मराठा प्रमुख कार्यकर्त्यांची सोमवारी सायंकाळी बैठक घेतली. त्यात कार्यकर्ते आंदोलनावर ठाम राहिले.
शहर पोलीस उपअधीक्षक चव्हाण म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधित आदेश जारी केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या काळात आंदोलन करू नये. कोरोनाचा संसर्ग अजूनही आहे. त्यामुळे हे आंदोलन स्थगित करावे.
महेश जाधव म्हणाले, आमचे आंदोलन दगडफेक अथवा सरकारविरोधी घोषणा वा पुतळा जाळला जाणार नाही. सकाळी ११ ते १२ या दरम्यान रास्तारोको केला जाईल. त्यासाठी शहरातील अन्य रस्ते अडवू नका. ॲड. बाबा इंदुलकर म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथीसाठी एक हजार कोटी रुपयांची घोषणा केली. ही सभागृहात केली असती तर त्याला अधिक महत्त्व होते. कारण त्याची सभागृहाच्या पटलावर नोंद होते. त्यामुळे त्यांच्या घोषणेचा काही उपयोग नाही.
प्रा. जयंत पाटील म्हणाले, यापूर्वी १५ दिवस आंदोलन करू नका असे पोलिसांनी सांगितले होते. त्यामुळे त्यांचा शब्द आम्ही ऐकला. आता आम्ही आंदोलन करणार आहोत. पोलिसांनी आपले काम केले आता आम्ही समाजाचे काम करणार आहोत.
दिलीप देसाई म्हणाले, खासदार संभाजीराजे यांचे राज्यात आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही कोल्हापुरात मंगळवारी सकाळी आंदोलन करणार आहोत.
यावेळी अजित राऊत, निवास साळोखे, बाबा पार्टे, सचिन तोडकर, रविकिरण इंगवले, शिवाजीराव जाधव, मंजित माने, आदी उपस्थितांनी चर्चेत सहभाग घेतला. पोलिसांतर्फे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, श्रीकृष्ण कटकधोंड, अनिल गुजर आदी अधिकारी उपस्थित होते.
नोटिसा बजावल्या
जिल्ह्यात प्रतिबंधित आदेश असल्यामुळे ताराराणी चौकात रास्तारोको करता येणार नाही. आंदोलनास परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे ते करू नये, केल्यास कारवाई होईल अशा कलम १४९ प्रमाणे प्रत्यक्ष १५ जणांना तर एकूण २५ जणांना शाहूपुरी पोलिसांनी नोटिसा बजावल्या.
फोटो : २१०६२०२१-कोल-शिवाजी मंदिर
आेळी : मराठा आरक्षणासंदर्भात ताराराणी चौकात आज,मंगळवारी सकल मराठा समाजातर्फे होणारे आंदोलन स्थगित करावे, यासाठी पोलीस प्रशासनातर्फे सर्व कार्यकर्त्यांची सोमवारी सायंकाळी शिवाजी मंदिरात बैठक आयोजित केली होती.