कोल्हापूर : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रलंबित भरती प्रक्रियांबाबत अपेक्षित कार्यवाहीचे पत्र सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या संस्थेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले आहे. या पत्रावर नाव असणाऱ्या डॉ. तन्मय व्होरा यांच्या लक्ष्मीपुरी येथील हॉस्पिटलमध्ये बुधवारी दुपारी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यांनी तेथील फलक फाडला. मुख्यमंत्र्यांना पाठविलेले पत्र मराठा समाजाच्या विरोधात असल्याने ते मागे घ्यावे, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला. आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेतले.या पत्रावर डॉ. व्होरा यांचे नाव असल्याने याबाबत त्यांच्याकडे विचारणा करण्यासाठी क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. या कार्यकर्त्यांना पोलीसांनी रोखले. डॉ. व्होरा यांनी सकल मराठा समाजाची माफी मागावी, तरच आंदोलन थांबविण्यात येईल, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. त्यावर डॉ. व्होरा यांनी म्हणणे मांडल्यानंतर आंदोलन थांबले.
या आंदोलनात सचिन तोडकर, दिलीप पाटील, नितीन देसाई, भास्कर पाटील, आदी सहभागी झाले. दरम्यान, मराठा समाजाचे कार्यकर्ते माझ्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर सेव्ह मेरीट सेव्ह नेशन या संस्थेने मुख्यमंत्री यांना पाठविलेले पत्र आणि त्यातील मजकूर मला समजला. त्या मजकूराशी मी सहमत नाही. ते पत्र सादर करताना या संस्थेने माझ्याशी व्यक्तीश: अथवा कोणत्याही प्रकारचा विचारविनिमय अथवा चर्चा केली नसल्याचा खुलासा डॉ. तन्मय व्होरा यांनी पत्रकाव्दारे केला.मराठा आरक्षणास माझा पाठिंबाया संस्थेच्या लेटरहेडवर माझे नाव आहे. परंतु, या पत्राच्या विषयासंदर्भात संस्थेने मला कोणत्याही प्रकारची माहिती न देता, माझे मत विचारात न घेता ते मुख्यमंत्री कार्यालयात दिले आहे. या संस्थेशी माझा कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही. देणगी मी दिलेली नाही. या प्रकरणात मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मराठा समाजाच्या आरक्षणास माझा पाठिंबा असल्याची माहिती डॉ. व्होरा यांनी दिली.