कोल्हापूर : मराठ्यांच्या राजधानी कोल्हापुरात कोणत्याही परिस्थितीत मराठा स्वराज्यभवन बांधायचेच, असा निर्धार मराठा महासंघाच्या बैठकीत करण्यात आला. महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांची राष्टÑीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जंगी सत्काराचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
मराठा महासंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी शाहू स्मारक येथे झाली. अध्यक्षस्थानी सी. एम. गायकवाड होते. अवधूत पाटील यांनी स्वागत केले. करवीर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील म्हणाले, ‘वसंतराव मुळीक यांचा सत्कार हा या मराठ्यांच्या राजधानीत कोल्हापूरला शोभेल, असा करण्यात येईल, हा सत्कार शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्याचा मानस आहे.’
महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्षा शैलजा भोसले म्हणाल्या, ‘संघटनेच्या वाटचालीत वसंतराव मुळीक यांचे योगदान फार मोठे आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने राष्टÑीय उपाध्यक्ष पदापर्यंत मजल मारली.’ जिल्हा संघटक रवी पाटील म्हणाले, महासंघाचे नवीन पदाधिकारी निवडी या वसंतराव मुळीक यांच्या विचारानेच व त्यांच्या मार्गदर्शनाखालीच व्हाव्यात. महासंघाचे सभासद वाढविण्यासाठी ‘घर तिथे सभासद व गाव तिथे शाखा’ काढण्याचा मानस मिलिंद ढवळे, प्रकाश पाटील, शिवाजी पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी शहर कार्याध्यक्ष उत्तम जाधव, संदीप देसाई, सुनील पाटील, नीलम मोरे, महादेव जाधव, विजयसिंह पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले. अनंत म्हाळुंगेकर, महादेव पाटील, रणजित आयरेकर, नितीन पाटील, प्रा. विद्याताई साळोखे, अश्विनी पाटील, संयोगीता देसाई, डॉ. विजया पाटील, संगीता राणे, अनिता टिपुगडे, शिरीष जाधव, आदी उपस्थित होते.