पोपट पवारकोल्हापूर : मराठा समाजातील युवक-युवतींच्या उन्नतीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने नव्याने उद्योग सुरू करणाऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या कर्जावरचा व्याज परतावाही लाभार्थ्यांना दिला जातो. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांना गेल्या पाच-सहा महिन्यांपासून हा परतावाच मिळाला नसल्याने महामंडळाकडील अनुदान संपले की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. हा परतावा मिळाला नसल्याने बहुतांश लाभार्थी अडचणीत आले असून ते महामंडळाकडे हेलपाटे घालत आहेत.या महामंडळाकडून मराठा समाजातील युवक-युवतींना छोटे उद्योग, पशुपालन यासह विविध उद्योगांसाठी ५० हजार ते १५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या कर्जावरील व्याज परतावाही महामंडळाकडून दिला जातो. पूर्वी दहा लाख रुपयांच्या कर्जावर तीन लाखांचा व्याज परतावा दिला जात होता. आत पंधरा लाख रुपयांच्या कर्जावर साडेचार लाख रुपयांचा परतावा दिला जात आहे. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यास साठ कोटी रुपये परतावा मिळाला आहे.त्रुटी असल्यास प्रस्ताव प्रलंबितलाभार्थ्यांना कर्ज मिळाल्यानंतर त्यावरील व्याज परतावा मिळण्यासाठी तीन महिन्यांचा प्रस्ताव ऑनलाइन स्वरूपात सादर करावा लागतो. जिल्ह्यातील अनेकांचे असे प्रस्ताव डिसेंबर २०२२ पासून प्रलंबित आहेत. मात्र, कागदपत्रात त्रुटी असतील तरच असे प्रस्ताव प्रलंबित ठेवले असल्याचे महामंडळाच्या जिल्हा समन्वयकांकडून सांगण्यात आले. अनेकांनी फोटो अपडेट न केल्यानेही त्यांचे प्रस्ताव सिस्टमला प्रलंबित दाखवित असल्याचे सांगण्यात आले.७१२ कोटी रुपयांचे वाटपअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने नोव्हेंबर २०१८ पासून आजतागायत कोल्हापूर जिल्ह्यात ८ हजार ५८७ जणांना ७१२ कोटी रुपयांची कर्जे विविध बँकांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहेत. लाभार्थ्यांना १२ टक्के दराने व्याज परतावा दिला जातो.
लाभार्थ्यांचा दोष
-काही लाभार्थ्यांनी ऑनलाइन सिस्टमला प्रस्ताव सादर करताना कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थित न केल्याने त्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. महामंडळाकडे अनुदान आहे, जे परिपूर्ण प्रस्ताव देतात त्यांना अनुदान मिळत असल्याचा दावा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कोल्हापूर कार्यालयातील समन्वयक ऋषिकेश आंग्रे यांनी केला.
७ फेब्रुवारीला मी पाच महिन्यांचा प्रस्ताव सादर केला होता. सर्व यंत्रणांकडून तपासणी होऊन तो अंतिम पेमेंटलाही गेला, पण नंतर ऑनलाइन सिस्टमला हा प्रस्ताव बाउन्स झाल्याचे दाखविते. त्यामुळे मला व्याज परतावा मिळालेला नाही. - युवराज पाटील, म्हाकवे, ता. कागल.