कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मराठा समाज सध्या शांत आहे. हा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हक्काचे आरक्षण मिळविण्यासाठी पुन्हा नेटाने लढा देण्याचा निर्धार शिवाजी पेठेतील बैठकीत कोल्हापुरातील मराठा समाजाने शुक्रवारी केला. या लढ्यासाठी शिवाजी पेठ, मंगळवार पेठ एकत्र आली आहे. शहरातील अन्य पेठांमधील तालीम संस्थांनादेखील लवकरच संघटित केले जाणार असल्याचे शिवाजी तरुण मंडळ तथा निमंत्रक मराठा समाज अन्यायविरोधी संघर्ष समितीचे समन्वयक सुजित चव्हाण यांनी सांगितले.
शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात या संघर्ष समितीतर्फे बैठक घेण्यात आली. आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाज शांत झाला आहे, असे कोणी समजू नये. वाढता कोरोना आणि त्याला रोखण्याबाबत राज्य सरकारने केलेल्या आवाहनामुळे मराठा समाजाने सध्या शांततेची भूमिका घेतली आहे. आरक्षण मिळविल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे सुजित चव्हाण यांनी सांगितले. केंद्र सरकार हे मराठा आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा. काहीही करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी निवास साळोखे यांनी केली. आरक्षण देण्यासाठी मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये सरकारने समावेश करावा. राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल करावी, असे बाबा इंदुलकर यांनी सांगितले. आरक्षणासाठी सर्वांनी एकत्रित येऊन ताकदीने लढा देऊया. मराठा समाजातील आमदार, खासदार यांनी आरक्षण मिळवून द्यावे, अशी मागणी महेश जाधव यांनी केली. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत फेरविचार याचिका दाखल केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानण्यात आले. यावेळी अजित राऊत, बाबा पार्टे, बाबा महाडिक, रविकिरण इंगवले, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, अशोकराव जाधव, चंद्रकांत साळोखे, शिवाजीराव जाधव, प्रतीश गायकवाड, पृथ्वीराज जगताप, अजिंक्य चव्हाण, अजित खराडे, सुरेश गायकवाड, प्रताप देसाई, श्रीकांत भोसले, राजू सावंत, मंजित माने, आदी उपस्थित होते. सुरेश जरग यांनी सूत्रसंचालन केले.
कोण, काय म्हणाले?
बाबा पार्टे : ९५ टक्के नेते मराठा समाजाचे आहेत. त्यांनी आरक्षणाचा मुद्दा मनावर घ्यावा. पुढील मोर्चे हे मूक स्वरूपातील असू नयेत.
जयकुमार शिंदे : शहरातील प्रत्येक तालीम संस्था, तरुण मंडळांना एकत्रित करून आरक्षणाचा लढा तीव्र केला जाईल.
राजू सावंत : टिकणारे आरक्षण मिळविण्यासाठी अभ्यास समिती नेमावी. मराठा समाजाने आंदोलन सुरूच ठेवावे.
कल्याणी माणगावे : मराठा समाज कसा मागास आहे ते राज्य सरकारने योग्य पद्धतीने मांडावे. सनदशीर मार्गाने लढा देणे आवश्यक आहे.
महादेवराव जाधव : आरक्षणासाठी भव्य मोर्चे काढण्यात यावेत. त्यात मराठा समाजबांधवांनी सहभागी व्हावे.