कोल्हापूर : मराठा समाजाला अडीच हजार वर्षांचा जातीचा उज्ज्वल इतिहास आहे. त्याचा अभ्यास करून त्यातील कुपरंपरांच्या बेड्या या समाजाने आता तोडून टाकायला हव्यात, अशा भावना या समाजातील मान्यवरांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. चौगले आडनावाबद्दल समाजात जी चुकीची भावना कारण नसताना निर्माण झाली आहे, ती दूर करण्याचे प्रबोधनाचे काम ‘लोकमत’ने केल्याबद्दल सर्वांनीच अभिनंदन केले.
चौगले आडनाव असलेले लोक मराठा कुणबीच असतानाही, त्यांना स्वत:ला ९६ कुळी मराठा समजणारे लोक, ते आमच्यात बसत नाहीत म्हणून कमी लेखतात. त्यातून चौगले समाजातील तरुण-तरुणींच्या लग्नकार्यात अडचणी येत आहेत. चौगले हे आमच्यात बसत नाहीत म्हणणारे ते का बसत नाहीत, याचे ठोस कारण देत नाहीत; कारण ते त्यांच्याकडे नसते.
कधीतरी दोन-तीनशे वर्षांपूर्वी ‘चौघुला’ म्हणजे ‘गावाची राखण करणारा’ या जबाबदारीतून त्यांच्याबद्दल गैरसमज तयार झाला व तो आजही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात लोकांच्या मनांत रुतून बसला आहे. आपल्याच एका बांधवाला तुच्छ लेखण्याची ही मानसिकता योग्य नव्हे, याच भावनेतून ‘लोकमत’ने या विषयाला तोंड फोडले व त्यासंबंधी काही चर्चा घडवून आणली. मराठा समाजातील समज-अपसमज-गैरसमजाच्या भिंती गळून पडाव्यात, हीच त्यामागील भूमिका होती.
तरुण इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, ‘मराठा जातीला अडीच-तीन हजार वर्षांचा उज्ज्वल इतिहास आहे; परंतु अलीकडील शे-दीडशे वर्षांतच त्यामध्ये काही कुपरंपरा निर्माण झाल्या आहेत. त्याला कोणताही आधार नाही. चौगले हे ९६ कुळीत बसत नाहीत, हा त्यांतीलच गैरसमज आहे. इतिहासात असे दाखले आहेत की, चौगले कुटुंबातील एका भावाकडे पाटीलकी आहे व दुसऱ्याकडे चौघुलकी.
आपल्याकडे जसे सगळेच पवार ‘आम्ही धारचे पवार आहोत’ असे म्हणतात; परंतु १७५७ ला पुणेजवळच्या सुपे येथून जाऊन शिवाजी पवार यांनी धारला संस्थान वसविले; परंतु त्याच्या आधीपासूनही पवार होते असे इतिहास सांगतो. त्यामुळे लोकांनी आपल्याच समाजाबद्दल काही गैरसमज असतील तर त्याचा अभ्यास करावा. चालत आलेले सगळेच चांगले असते असे नाही. ते आपण सत्यतेच्या कसोटीवर घासून बघितले पाहिजे.चौगले आडनांवाबद्दल अशाच तयार झालेल्या गैरसमजाबद्दल ‘लोकमत’ने समाजात चर्चा घडवून आणली, हे चांगले झाले. अशा प्रबोधनातूनच लोकांच्या मनांतील किल्मिषे गळून पडायला मदत होईल.’
मूळचे शाहूवाडी तालुक्यातील भेडसगावचे परंतु सध्या राजारामपुरीमध्ये राहणारे डॉ. सहदेव चौगले यांनीही ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेचे स्वागत केले. समाजात निकोप वातावरण तयार होण्यास अशा चर्चेची गरज असते,, असे सांगून ते म्हणाले, ‘चौगले आडनावाबद्दलचे गैरसमज हा अज्ञानाचा भाग आहे. इतर समाज चौगले यांच्याबद्दल काय समज करून घेतो यावरून आमचे काही अडलेले नाही. तुम्ही तुमच्या कर्तृत्वातून लोकमान्यता मिळवा, असे माझे सांगणे असते.’ (समाप्त)मराठा समाजातील चुकीच्या परंपरांबाबत प्रबोधन : मुळीकयासंबंधी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक म्हणाले, ‘मराठा समाजात अशा काही चुकीच्या प्रथा-परंपरा सुरू आहेत, त्याबद्दल प्रबोधनाचे काम आम्ही गेली अनेक वर्षे करीत आहोत. त्यास हळूहळू का असेना, परंतु यश येत आहे. आजही हा समाज ‘जन्मकुंडली’ व ‘९६ कुळी’चा फारच बाऊ करतो. चौगले आडनावाबद्दलचा गैरसमजही त्यातीलच प्रकार आहे. चौगल्यांनी दुसºयांना देशमुखी दिली आहे. तो गावाला मदत करणारा अशी त्याची ओळख होती. अशा समाजाबद्दल मराठा समाजाने मनांत भेद आणणे चुकीचे आहे. समाज संघटित नसल्याने हे प्रश्न निर्माण होत आहेत. चौगले आडनावाचे लोकही कर्तृत्ववान आहेत. ते मराठा जातीचेच आहेत. त्यांच्यात कोणताही उणेपणा नाही. त्यांच्याशी खुशाल सोयरिक करावी.