कोल्हापूर : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप मधुकरराव पाटील ( वय ६२ , रा. आय्यापा मंदिर, मुक्त सैनिक वसाहत परिसर, कोल्हापूर) यांचे शनिवारी निधन झाले. प्रकृती गंभीर झाल्याने कोल्हापूरहून पुणे येथे उपचारासाठी नेताना कराडजवळ त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई असा परिवार आहे.
पाटील यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईत उपचार सुरु होते. प्रकृती स्थिर झाल्याने त्यांना दोन दिवसांपूर्वी घरी आणले होते. मात्र शनिवारी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने कुटुंबियांनी कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रकृती गंभीर झाल्याने पुणे येथे उपचारासाठी नेण्याचा निर्णय घेतला. त्यांना घेऊन जात असताना वाटेतच निधन झाले. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी बराच काळ काम केले होते.
मराठा आरक्षण, ई. डब्ल्यू. एस संदर्भात त्यांनी दीर्घकाळ न्यायालयीन लढा दिला होता. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईचे ते याचिकाकर्ते होते. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यापासून ते सारथी सक्षम करण्यापर्यंत त्यांचा मोलाचा वाटा होता. अण्णासाहेब पाटील महामंडळ सक्षमीकरण आणि गुणरत्न सदावर्तेच्या विरोधातही न्यायालयीन लढा दिला होता. त्यांच्या निधनाने मराठा आरक्षण चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची खंत विविध क्षेत्रातून व्यक्त करण्यात आली.