कोल्हापूर : ‘मराठा आरक्षण घेणार माझ्या सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धरा’, असा शाहीर विशारद आझाद नायकवडी यांनी पोवाडा सादर करून, तर राष्ट्रवादी, युवासेना, निवृत्त पोलिस अधिकारी कल्याणकारी संघटना अशा विविध संस्था, संघटनांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला बुधवारी पाठिंबा दिला.मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी दसरा चौक येथे सकल मराठा ठोक मोर्चाने मंगळवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
बुधवारी सकाळी आंदोलनस्थळी शाहीर विशारद आझाद नायकवडी यांनी मराठा आरक्षणाबाबतचा पोवाडा सादर केला. ‘मराठा आरक्षण घेणार माझ्या सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धरा’ अशा शब्दांत मराठा समाजाचा निर्धार व्यक्त केला. त्यांना शाहीर पापालाल नायकवडी, युवराज पुजारी, शिवाजी लांडगे, स्वराज नायकवडी, भार्गव कांबळे, बापूसाहेब साळोखे यांनी साथ दिली.
युवासेना, शिवसेनेचे ऋतुराज क्षीरसागर, पदमाकर कापसे, दिपक गौड, तुकाराम साळोखे, आदींनी भेट देवून पाठिंबा दिला. त्यांनी ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. त्यानंतर माजी आमदार पी. एन. पाटील, निवृत पोलिस अधिकारी कल्याणकारी संघटनेचे मदन चव्हाण, प्रभाकर पाटील, पी. जी. मांडरे, बी. बी. पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला.
कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने माजी महापौर आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी पाठिंब्याचे पत्र दिले. त्यासह ‘राष्ट्रवादी’चे पदाधिकारी, कार्यकर्ते गुरूवारी या ठिय्या आंदोलनात सहभागी होतील असे सांगितले. यावेळी जहिदा मुजावर, अनिल घाटगे यांच्यासह नगरसेवक आदी उपस्थित होते.