कोल्हापूरः मराठा आरक्षणासाठी आंदोलन पेटलं असताना मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला जात आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भवितव्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यातील वजनदार नेते शरद पवार यांनी आज फडणवीसांना मोठाच आधार दिला.
'येत्या काळात निवडणुका आहेत, भाजपाने मुख्यमंत्री बदलला तर त्याचा आम्हाला फायदाच होईल', अशा शब्दांत शरद पवारांनीदेवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे प्रमाणपत्रच दिलंय. फडणवीस चांगलं काम करताहेत, जनमानसांत त्यांची प्रतिमाही चांगली आहे, त्यामुळे त्यांना बदलणं भाजपासाठी धोक्याचं ठरू शकतं, असं पवारांनी सूचित केलं आहे. या 'बिटवीन द लाइन्स'मुळे फडणवीसांची 'लाइन क्लिअर' झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.
निवडणूक आली की पवारांना जात आठवते, असं म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी आधी जनतेतून निवडून येऊन दाखवावं, असा टोलाही त्यांनी हाणला. तोही देवेंद्र फडणवीस यांच्या पथ्यावर पडणाराच आहे. कारण, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचं भाजपातील वजन वाढलंय आणि ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार ठरू शकत असल्याची चर्चा काही दिवसांपासून रंगली आहे.
काकासाहेब शिंदे या तरुणाच्या जलसमाधीनंतर सकल मराठा समाजाचे आंदोलन चिघळलं. आधी 'महाराष्ट्र बंद' आणि नंतर 'मुंबई बंद'ला हिंसक वळण लागलं. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याचे प्रयत्न मराठा क्रांती मोर्चा आणि विरोधकांकडून होत आहेत. झेपत नसेल तर पायउतार व्हा, असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांकडून फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येतेय. स्वाभाविकच, मुख्यमंत्री समर्थकांमध्ये सुरुवातीला अस्वस्थता निर्माण झाली होती. परंतु, रवी राणा यांच्यासह सहा अपक्ष आमदार फडणवीसांच्या पाठीशी उभे राहिले होते. मुख्यमंत्री बदलले तर पाठिंबा काढू, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर आता शरद पवार यांनी तर मुख्यमंत्र्यांना 'सेफ झोन'मध्येच नेऊन ठेवलंय.
मुख्यमंत्री बदलायचा की नाही, हे ठरवण्याचा अधिकार भाजपाला आहे. आम्हाला नाही. पण, त्यांनी मुख्यमंत्री बदलल्यास आम्हाला फायदाच होईल, अशी सूचक प्रतिक्रिया पवारांनी दिली. विनाकारण जातीय वाद निर्माण केला जात असल्याची टीका करतानाच, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर हे ब्राह्मण होते, अशी आठवणही त्यांनी करून दिली.
राजीनामे देऊ नका!
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारशी भांडा, राजीनामे देऊ नका, असा सल्ला शरद पवार यांनी मराठा आमदारांना दिला. १५ वर्षं सत्तेत होतात तेव्हा काय केलंत, असं अनेक जण विचारत आहेत. पण आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, असंही त्यांनी नमूद केलं. उदयनराजे आणि संभाजीराजे यांनी मराठा आंदोलनाचं नेतृत्व करण्याची विनंती आंदोलक करत आहेत. पण, सरकार सर्वच पक्षांशी बोलत असल्यानं त्याची आवश्यकता नसल्याचंही पवार म्हणाले.