कोल्हापूर : मराठा समाजाच्या आंदोलनात भाडोत्री लोक नाहीत हे चंद्रकांत पाटील यांनी लक्षात घ्यावे, या सरकारची आरक्षण देण्याची मानसिकता नसल्याची टीका माजी आमदार पी. एन. पाटील यांनी केली.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी दसरा चौक येथे सकल मराठा ठोक मोर्चाने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी सकाळी आंदोलनस्थळी माजी आमदार पी. एन. पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
पूर्वीच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र, सध्याच्या सरकारला ते टिकविता आले नाही. या सरकारची आरक्षण देण्याची मानसिकता नसल्याचे माजी आमदार पी. एन. पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, मराठा समाजाच्या पाठीशी काँग्रेस राहील.
विरोधी पक्षात असताना चंद्रकांत पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी विधानपरिषदेच्या सभागृहाबाहेर घोषणा देत होते. मात्र, आज सत्तेत असताना मराठा समाजाच्या आंदोलनात पेड लोक असल्याचे सांगत आहेत.माजी आमदार पी. एन. पाटील, निवृत पोलिस अधिकारी कल्याणकारी संघटनेचे मदन चव्हाण, प्रभाकर पाटील, पी. जी. मांडरे, बी. बी. पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला.