कोल्हापूर : १८२७ सालापासून विस्कळीत झालेला मराठा १९० वर्षांनी एकत्र येऊ लागला आहे. मराठा समाज हक्कांसाठी लढताना कर्तव्याची जाण ठेवणारा आहे. राजकीय क्षेत्रात मराठा नेते बहुसंख्येने असल्याचा फायदा होण्यापेक्षा तोटाच जास्त झाला. मराठा समाजाकडे कुटुंबप्रमुखासारखे पाहिले जाऊ लागले. पर्यायाने समाजावरील जबाबदारी वाढली. तुमचे नुकसान झाले तरी चालेल; पण इतर कोणावर अन्याय होऊ देऊ नका, या परंपरागत शिकवणीमुळे मराठा समाजाचे नेतेदेखील आरक्षण व सवलती इतर समाजास देण्यास पुढाकार घेऊ लागले. इतर जातींना दिलेल्या आरक्षणाबाबत हरकत नाही; पण ज्या सवलती दिल्या, त्या ‘सवलती’ म्हणून न मानता त्यांचा अर्थ ‘हक्क’ असा घेऊन त्यांचा गैरवापर सुरू झाला. त्यामधून स्वप्रगतीशिवाय बाकी जबाबदाऱ्या दुर्लक्षित होऊ लागल्याचे मत जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. विवेक घाटगे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. ते म्हणाले, १९५० मध्ये राज्यघटनेने जातीच्या कारणावरून आरक्षणाची सुरुवात केली, ती आजअखेर सुरू राहिली. आरक्षणामुळे पात्रता असूनही नाकारले गेल्याची भावना हळूहळू पसरू झाली. सर्वसामान्य जागेसाठी कोणत्याही जातीतील पात्र व्यक्ती भाग घेऊ शकते. आरक्षित जागेसाठी मात्र त्याच जातीतील व्यक्तीस परवानगी असते. त्यामुळे इतर जातींना आरक्षण दिले असे म्हणण्यापेक्षा मराठ्यांना किंवा खुल्या वर्गांना प्रतिबंध केला असे म्हणणे योग्य होईल. हा अन्याय, पात्रता असूनही नाकारल्याची भावना, विशिष्ट जातीचा म्हणून हुकलेली संधी, फक्त मराठा आहे म्हणूनच. या परिस्थितीस आम्ही मराठेदेखील काहीअंशी कारणीभूत आहोत. कोणताही सारासार विचार न करता एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा राबवायचा हा खेळ मराठ्यांना महागात पडला. मराठा नेत्यांचेच अनेक पक्ष झाले व त्यांमध्ये मराठा समाज विभागला गेला. एकमेकांवर कुरघोडी करीत राहिला. अशा पक्षांत काही अल्पसंख्याक समाजाचे लोक आले व पक्षात राहूनही स्वतंत्र जातीमुळे अस्तित्व ठेवून त्याच पक्षामार्फत आपल्या जातीच्या लोकांचा विचार करू लागले. मराठा नेते मात्र मराठा आहोत, मोठ्या भावाची जबाबदारी जास्त असते. आधी समाजाला दिले पाहिजे, असे गोंडस उत्तर देऊन मराठ्यांच्या जिवावर राजकीय कारकिर्द चालू ठेवत राहिले. या सर्व बाबी हळूहळू बाहेर येत त्यांचे रूपांतर असंतोषामध्ये झाले. मराठ्यांच्या पूर्वेतिहासानुसार सर्व समाजाची जबाबदारी आपल्यावरच आहे, असा विचार करून मोर्चाने बाहेर पडत आहे. यापुढे जातीपातींचे राजकारण होणार नाही मोर्चामध्ये सामील होत असलेले मराठे व त्यांना पाठिंबा देणारे इतर समाज या सर्वांचे एकमत झाले आहे. कोणत्याही राजकीय व्यक्तीचे पाठबळ नको, मोर्चात राजकीय अस्तित्व नको, कोणत्याही पक्षाचा अजेंडा नको, हा प्रस्थापित मराठा नेत्यांना खूप मोठा इशारा आहे. यापुढे जातीपातीचे राजकारण होऊ शकणार नाही. मराठा समाजास प्रत्येक वेळी सबुरीने घ्या, असा सल्लादेखील चालणार नाही. मराठ्यांची मागणी योग्य व इतर जातींच्या विरुद्ध नाही.
राजकीय क्षेत्रात मराठा नेते जास्त असूनही तोटा
By admin | Published: October 10, 2016 12:54 AM