लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मुंबईत आज, बुधवारी मोर्चाद्वारे उमटणाºया कोट्यवधी मराठी मनांच्या नि:शब्द हुंकारात सामील होण्यासाठी कोल्हापुरातून मंगळवारी दिवसभर हजारो मराठा बांधवांनी ‘राजधानी’कडे कूच केले. सकाळपासून मिळेल त्या वाहनाने मराठा बांधव मुंबईकडे जात होते. रात्री रेल्वेने अनेकजण रवाना झाले. महालक्ष्मी एक्स्प्रेसबरोबरच कोल्हापुरातून रात्री पावणेअकरा वाजता निघणाºया सह्याद्री एक्स्प्रेसलासुद्धा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने आपल्या न्याय्य हक्कांसाठी शांततेने आणि सनदशीर मार्गाने आतापर्यंत मूक मोर्चे काढले आहेत. यापुढील आणखी एक टप्पा म्हणून महाराष्ट्राच्या राजधानीवरच धडक देणारा विराट मोर्चा आज, बुधवारी मुंबईत निघत आहे. यामध्ये जिल्ह्यातून सोमवारी (दि. ७) मुंबईमध्ये मोर्चाच्या ठिकाणी पार्किंग व्यवस्थेस मदत करण्यासाठी शहरातून स्वयंसेवकांच्या पथकांसह ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकही नियोजनाप्रमाणे मुंबईकडे रवाना झाले.पहाटेपासून अनेकजण खासगी वाहनांसह मुंबईकडे जात असल्याने राष्ट्रीय महामार्गावर मोठी गर्र्दी झाल्याचे चित्र दिसून आले. रेल्वेस्थानकांना मंगळवारी रात्री यात्रेचे स्वरूप आले होते. अंगात पिवळा टी-शर्ट, हातात भगवा झेंडा, ‘जय शिवाजी, जय भवानी,’ ‘आरक्षण आमच्या हक्काचे...’ अशा घोषणा देत मुंबई मोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातून सुमारे दीड हजार मावळे रात्री महालक्ष्मी एक्स्प्रेसने रवाना झाले.मोर्चाला जाण्यासाठी सायंकाळी सहा वाजल्यापासूनच गर्दी होत होती. या ठिकाणी मराठा मावळ्यांचे प्रमुख संदीप पाटील, स्वप्निल पार्टे यांनी मुंबई मोर्चाच्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली. मोर्चासाठी शिस्तीचे पालन काटेकोरपणे कसे करावयाचे याबाबत सूचना दिल्या.मुस्लिम बांधवांचीही सामाजिक बांधीलकीशांततेच्या मार्गाने मराठा समाजाचा हा मोर्चा काढण्यात येत असल्याने त्याने अनेक जातिधर्मांची मने जिंकून घेतली आहेत. त्यामुळे त्याला सर्व स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. आतापर्यंतच्या इतिहासातील ही वेगळीच घटना अवघा महाराष्ट्र अनुभवत आहे. या मोर्चाला मराठा समाजाबरोबरच मराठेतर समाजांनीही आपला सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे. अर्थातच यात मुस्लिम समाजबांधवही आघाडीवर आहेत. याचे चित्र मंगळवारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर दिसून आले. मुस्लिम बोर्डिंग व मुस्लिम समाजाच्या वतीने मोर्चाला जाणाºया मराठा बांधवांना पाण्याच्या बाटल्या, बिस्किटांचे वाटप करण्यात आले.मोफत फूड पॅकेटमाजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्यातर्फे मुंबईला जाणाºया मराठा मावळ्यांसाठी मोफत फूड पॅकेटचे वाटप कोल्हापूरच्या रेल्वेस्थानकावर झाले.पोलिसांचा मोठा बंदोबस्तमुंबईतील सकल मराठा क्रांती मूक मोर्चासाठी कोल्हापुरातून सकल मराठा समाजबांधव रेल्वेने मुंबईकडे रवाना झाले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.मावळ्यांना मोर्चाची आचारसंहिताआपल्यामुळे कोणत्याही प्रवाशांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, मोर्चाला कोणतेही गालबोट लागू देऊ नये, असे आवाहन आयोजकांनी केले. तसेच ज्या प्रवाशांनी रेल्वेचे आरक्षण केले आहे, त्यांच्या जागेवर कोणी बसू नये, अशा सूचना केल्या. त्यांच्या सूचनांचे पालन मावळ्यांनीही केले. कोणीही आरक्षणाच्या जागेवर न बसता रेल्वे प्रशासनाने जोडून दिलेल्या डब्यामध्येच सर्वजण बसले होते.
मराठा मावळ्यांची राजधानीकडे कूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 12:50 AM