कोल्हापूर : कोल्हापुरात शनिवारी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चावेळी निवेदनाविषयी कोअर कमिटी जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, मोर्चाला मी सामोरे जाणार नसल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांनी निवेदन स्वीकारण्यावरून सुरु झालेल्या वादावर पडदा पडला.शनिवारी कोल्हापुरात निघणाऱ्या सकल मराठा क्रांती मोर्चावेळी शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देताना आपण उपस्थित राहणार असल्याची भूमिका पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतली होती; पण पालकमंत्र्यांच्या या भूमिकेला सकल मराठा समाज कोअर कमिटीने आक्षेप घेतला होता. त्यांनी निवेदन स्वीकारण्याचा हट्ट धरल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे फिरकणार नाही व मोर्चाचेही विसर्जन करणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्याची दखल घेत पालकमंत्र्यांनीच स्वत:हून एक पाऊल मागे घेत समन्वयाची भूमिका घेतली. त्यासंबंधीची भूमिका ‘लोकमत’कडे मांडताना पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘राज्यभर सकल मराठा समाजाचे मोर्चे निघत असताना कोल्हापुरातील मोर्चावेळी राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी संवाद सुरू ठेवण्याबाबत भूमिका घेतली होती; पण मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्यास त्यासाठी माझी काहीही हरकत नाही. मोर्चाच्यावतीने कोअर कमिटी जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे. राज्यात इतर जिल्ह्यांत ज्याप्रमाणे मोर्चा निघाला, त्या मोर्चाच्या शिष्टमंडळातील मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्याप्रमाणे कोल्हापुरातही मुलींनी निवेदन द्यावे. प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारून ते पुन्हा सरकारकडेच म्हणजे माझ्याकडेच देणार होते. त्यामुळे मी सरकार म्हणून हे निवेदन स्वीकारणार होतो. मोर्चातील प्रतिनिधी आणि सरकार यांच्यात संवाद सुरू होणे आवश्यक होते पण कोअर कमिटी जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे, त्यामुळे मी मोर्चाला सामोरे जाणार नाही.’माझी भूमिका सकारात्मकराज्यभर लाखोंच्या संख्येने निघणाऱ्या सकल मराठा क्रांती मोर्चाची कोंडी फोडण्याची जबाबदारी आपल्यावर शासनाने दिलेली आहे काय? या प्रश्नावर पालकमंत्री पाटील यांनी, माझी राज्य शासन म्हणून सकारात्मक भूमिका होती इतकेच उत्तर त्यांनी दिले; तसेच मोर्चातील सहभागाबाबत मात्र त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.मागण्या मान्य करण्यास कटिबद्धराज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून सकल मराठा समाजाच्या सर्व मागण्या लवकरात लवकर मान्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहूंच्या कार्याचा मी सच्चा पाईक आहे. समाजाच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन, अशीही ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
मराठा मोर्चाला सामोरे जाणार नाही
By admin | Published: October 13, 2016 1:56 AM