कोल्हापूर : मराठा आरक्षणाची लढाई न्यायालयीन पातळीवर सुरू असल्याने ती आता कायद्याच्या शस्त्रांनीच जिंकावी लागेल, त्यासाठी राज्यातील सर्व मराठा खासदार, आमदारांनी जबाबदारी म्हणून एकत्र यावे. प्रसंगी कार्यक्रम बाजूला ठेवून मराठा आरक्षणाकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे आवाहन खासदार संभाजीराजेंनी केले.सकल मराठा समाजाच्यावतीने रविवारी शिवाजी पेठेत दसरा मेळाव्यात खा. संभाजीराजे बोलत होते. निवृत्ती चौकात छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन व शस्त्रपूजन झाले.खा. संभाजीराजे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी सर्वप्रथम १९०२ मध्ये बहुजन समाजाला आरक्षण मिळवून दिले. काळाच्या ओघात मराठा समाज यातून बाहेर गेला. सध्या ८५ टक्के मराठा समाज गरीब आहे. त्याला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळाल्यास पुन्हा मुख्य प्रवाहात येईल. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण हवे आहे, असेही ते म्हणाले.कायद्याची लढाईकोल्हापुरातून आंदोलनाला मिळालेली दिशा महाराष्ट्रभर पसरते, आता कायद्याच्या हत्याराने लढाई करायची आहे. सर्वोच्च न्यायालयात २७ ऑक्टोबरला मराठा आरक्षण स्थगितीवर सुनावणी आहे, त्यात राज्य शासनाने मराठा समाजाची बाजू भक्कमपणे मांडावी, असेही संभाजीराजेंनी आवाहन केले.मेळाव्याचे संयोजक प्रसाद जाधव यांनी, मराठा आरक्षण लढ्यातील कामकाजासाठी शिवाजी मंदिरची इमारत मोफत उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, उमेश पोर्लेकर, लालासाहेब गायकवाड, शिवाजी जाधव, विक्रम जरग, अजित राऊत, ॲड. योगेश साळोखे, चंद्रकांत सूर्यवंशी, श्रीकांत भोसले, बाबा महाडिक, किशोर घाटगे, वसंतराव वठारकर, संजय ओतारी, रणजित पोवार, सुहास साळोखे, कृष्णात वरुटे, बापू लिंग्रस, रेखा दुधाणे यांच्यासह शिवाजी पेठेतील विविध तालीम, तरुण मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रकाश सरनाईक यांनी आभार मानले.शिवाजी मंदिर लढ्याचे मुख्य केंद्रमराठा आरक्षणाच्या लढ्यात दोन वर्षांपूर्वी मराठा क्रांती मोर्चाचे नियोजन, बैठकीचे केंद्र हे शिवाजी मंदिरच होते. यापुढेही बैठका, नियोजन, मराठा बांधवांच्या शंका निरसनसाठी शिवाजी मंदिरची इमारत मोफत उपलब्ध केल्याच्या घोषणेचे संभाजीराजे यांनी स्वागत केले.