कोल्हापृूर : मराठा आरक्षण आंदोलनाला विविध पक्ष, संघटनांसह ग्रामीण भागातून पाठिंबा वाढत आहे. ठिय्या आंदोलनाच्या सातव्या दिवशी सोमवारी करवीर आणि कागल तालुक्यांतील सुमारे २५ हून अधिक गावांनी आपले व्यवहार बंद ठेवून भगवे झेंडे फडफडत, ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’ असा नारा देत दुचाकी रॅलीने कोल्हापुरात दसरा चौकातील आंदोलनात सहभाग नोंदविला.
याशिवाय खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री जयवंतराव आवळे, माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह काही प्रमुख नेत्यांनी शासनविरोधी भूमिका घेत मराठा आरक्षण आंदोलनाची धार वाढविली.दरम्यान, चार आंदोलकांनी सरकाच्या निषेधार्थ प्रतीकात्मक फाशी आंदोलनाचे दृश्य साकारले. त्यावेळी शेवटची इच्छा म्हणून ‘आम्हाला मराठा आरक्षण द्या’ अशी भावना व्यक्त करण्यात आली.
भगव्या टोप्या, फडफडणारे झेंडे आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’, मराठा आरक्षण आमच्या हक्काचे’ अशा घोषणांनी दसरा चौक दुमदुमला. ग्रामीण भागात सर्व व्यवहार बंद ठेवून आंदोलक दुचाकी रॅलीने दसरा चौकात येऊन आंदोलनाची धार वाढवत होते. आंदोलनास दिवसेंदिवस अनेक संघटना, पक्षांचा पाठिंबा वाढत आहे.मराठा आरक्षण आंदोलनास दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे. जिल्ह्यातील करवीर आणि कागल तालुक्यातील सुमारे २५ हून अधिक गावांनी आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी गाव बंद आंदोलन केले. सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून गावातून कोल्हापुरात दसरा चौकापर्यंत दुचाकी रॅली काढून ‘आरक्षणाचा गजर’ केला.
कोल्हापूर जिल्हा मूक-कर्णबधिर असोसिएशननेही मोर्चा काढून ठिय्या आंदोलनस्थळी खासदार शेट्टी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. दसरा चौकात ठिय्या आंदोलनस्थळी सोमवारी जिल्ह्याच्या विविध भागांतून अनेक आंदोलकांनी सहभाग दाखविला.
याशिवाय कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या सुमारे ३८०० वकिलांनी न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहून दसरा चौकातील ठिय्या आंदोलनात सहभाग दर्शविला. मराठा आरक्षण आंदोलकांवर गुन्हे नोंदविल्यास न्यायालयात जिल्हा बार असोसिएशन विनामूल्य वकील देणार असल्याची यावेळी घोषणाही करण्यात आली. तसेच उच्च न्यायालयातील मराठा आरक्षण प्रश्नावर सुरूअसलेल्या सुनावणीसाठीही बार असोसिएशन मदत करेल, अशीही ग्वाही अनेक वकिलांनी दिली.