कोल्हापूर : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यामध्ये महाराष्ट्र सरकारला यश आले नाही, याबद्दल निषेध करतानाच यामुळे मराठा समाजातील युवक-युवतींचे भवितव्य देशोधडीला लागेल, अशी भीती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर ही स्थगिती उठविली न गेल्याने पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन सरकार सुरुवातीपासून या प्रक्रियेमध्ये गंभीर नसल्याचा पुनरूच्चार केला.पाटील म्हणाले, आम्ही इतक्या वेळा सांगूनही आज दिल्लीत कोणीही मंत्री गेले नाहीत. ॲडव्होकेट जनरल गेले नाहीत. वकिलांकडे संपूर्ण माहिती नसल्याने त्यांना तारीख मागावी लागली. नवीन कोणतेच मुद्दे नसल्याचे न्यायाधीशांनीच स्पष्ट केले.
यामुळे आपली नाचक्की झाली. या सरकारला दिशा नाही; त्यामुळे ती वकिलांनाही नाही. या सगळ्यांचा हा परिणाम आहे. स्थगितीच्या आधीच्या नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशाबाबत तरी सरकारने आपली बाजू न्यायालयाला पटवून देण्याची गरज होती.पाटील म्हणाले, उच्च न्यायालयात १०२ व्या घटना दुरूस्तीचा विषय होता. मात्र, देवेंद्र फडणवीस हुशार आहेत. त्यांनी आमचा हा कायदा २०१४ चा आहे. त्यामध्ये केवळ दुरुस्ती केली आहे. त्यामुळे १०२ वी घटना दुरुस्ती मराठा आरक्षणाला लागू होत नाही, असा युक्तिवाद केला गेला आणि तो मान्यही झाला. आता मराठा समाज तूर्त तरी २५ जानेवारीपर्यंत आरक्षणातून बाहेर पडल्यामुळे ज्या-ज्या इतर मागासांना सवलती देण्यात येतात, त्या-त्या मराठा समाजाला दिल्या पाहिजेत.