कोल्हापूर : मराठ्याला आरक्षण देण्यासाठी सरकारला सुबुद्धी दे असं आई अंबाबाईला साकडं घालत मंगळवारी मराठा क्रांती संघटनेच्यावतीने अभिनव आंदोलन करण्यात आले. धाव अंबाबाई गोंधळ मांडिला आम्ही गोंधळाला यावं.., शिवाजी महाराज पोलाचादी पार आहे, मराठ्यांची पोरं त्यांच्या तलवारीची धार आहे. भिणार नाही कधी तलवारीच्या पातीला बट्टा लावणार नाही कधी मराठ्यांच्या जातीला, मराठ्यांची पोरं कधी झुकणार नाही.. म्हणत कोल्हापुरकरांनी देवीच्या दारात गोंधळ जागर करून मराठा आरक्षण प्रश्नी सरकारला जागं करण्याचा प्रयत्न केला.मराठा आरक्षणासाठी राज्यभरात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मराठा क्रांती संघटनेच्यावतीने अंबाबाईला साकडं घालण्यात आले. त्यासाठी शिवाजी पेठेसह कोल्हापुरातील विविध तरुण मंडळे, उपनगर, करवीर येथील कार्यकर्ते सकाळी शिवाजी मंदिरात जमले.
महाद्वार चौकात पारंपारिक गोंधळ घालण्यात आला. (छाया : आदित्य वेल्हाळ)
येथून समोर हातात चौंडकं, संबळ घेतलेले गोंधळी मागे शेकडो कार्यकर्ते हातात भगवे झेंडे, डोक्यावर भगवी टोपी, गळ््यात भगवे स्कार्फ तर भगव्या साड्या परिधान केलेल्या महिला पायी अंबाबाई मंदिराकडे निघाले.
यावेळी महापौर शोभा बोंद्रे, वैशाली क्षीरसागर, संगीत खाडे, माजी महापौर सई खराडे, राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या सुनिता पाटील, भुयेवाडीच्या माजी सरपंच राणी पाटील, मराठा क्रांती संघटनेचे सुरेश पाटील, माजी आमदार सुरेश साळोखे, रवि इंगवले उपस्थित होते.
महाद्वार चौकात आल्यानंतर जागर गोंधळ सुरू झाला. अंबा माता की जयचा गजर करत गोंधळींनी कोल्हापुरची अंबाबाई गोंधळाला ये म्हणत मराठा आरक्षणप्रश्नी देवीला साद घातली. गणपतीची व देवीची आरती झाल्यानंतर प्रातिनिधीक स्वरुपात दहा महिला अंबाबाई मंदिरात गेल्या. तेथे त्यांनी देवीला मराठा आरक्षणासाठी सरकारला सुबुद्धी असे साकडे घातले.
यावेळी कोण म्हणतंय देत नाही घेतल्या शिवाय राहत नाही, एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देण्यात आल्या. मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर येथेच सभा विसर्जित करण्यात आली. या आंदोलनात मराठा रणरागिणी संघटना, राजमाता जिजाऊ ब्रिगेड, शिवसेना महिला आघाडी, भागिरथी महिला संस्थांनी तसेच शिवाजी पेठेतील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.परिसराला बंदचे स्वरुपया आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बिनखांबी गणेश मंदिरपासून महाद्वार रोडपर्यंतची सगळी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. परिसरातील फेरीवाले हटवून महाद्वार चौकापासून ते जोतिबा रोडप़र्यंतचा रस्ता मोकळा करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात होता. शहर पोलीस उपअधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर स्वत: जातीने उपस्थित होते.शिवाय येथे अग्निशमन यंत्रणा, अॅम्ब्युलन्स, सर्व्हीलन्स व्हॅन अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.