सुनिल चौगलेआमजाई व्हरवडे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या आदेशानुसार राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील आमजाई व्हरवडे व खिंडी व्हरवडे या दोन गावात आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तर आगामी सर्व निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेणारी कोल्हापूर जिल्ह्यातील ही पहिली गावे आहेत.मराठा आरक्षणप्रश्नी सरकारने ३० दिवसांचा वेळ घेतला होता. आज ४१ दिवस झाले. मात्र सरकारने यावर कसल्याही प्रकारचे पाऊल न उचलल्याने आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा उपोषण सुरु केले आहे. मराठा बांधवानी आत्महत्या न करता आरक्षण मिळत नाही तोपर्यत कोणत्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावात प्रवेश बंदी करा. मात्र हे करत असताना कोणीही कायदा हातात घेऊ नका असे आवाहन जंरागे पाटील यांनी केले आहे.या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील आमजाई व्हरवडे व खिंडी व्हरवडे या दोन गावात राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तर आगामी सर्व निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रास्ता रोको करण्याचा इशारा देत आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्वच नेत्यांचा निषेध करण्याचा निर्णय घेतला. मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतल्याने नेत्यांची मोठी कोंडी होणार आहे.आरक्षणासाठी मराठा समाजाचा कित्येक वर्षे लढा सुरु आहे. पण शासन याकडे गांभिर्याने पाहत नसल्याचे दिसते. मनोज जरांगे पाटील पाटील यांना पाठीबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आम्ही ही कठोर भूमीका घेतल्याचे आमजाई व्हरवडेचे उपसरपंच कृष्णात चौगले यांनी सांगितले.गावातील मराठा समाजाने केलेल्या मागण्या अशा-
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा कुणबीत समावेश करावा, मराठा समाजासाठी बलिदान दिलेल्या ४५ बांधवाच्या कुंटुंबाला आर्थिक मदत तसेच कुंटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी अशा विविध मागण्या केल्या आहेत.