कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे गुरुवारी आॅगस्ट क्रांतीदिनी कोल्हापूर बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. हा बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे करण्यात आले आहे.मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यभरात ५८ मूकमोर्चे काढून निवेदन दिले होते; परंतु त्यांनी समाजाला कोणत्याही प्रकारे न्याय दिलेला नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार घेतली जाणार नाही, अशा ठाम निर्धाराने सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाने दि. २४ जुलैपासून कोल्हापुरातील दसरा चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले.
विविध तरूण मंडळे, संस्था, संघटना, समाज आणि शहर आणि ग्रामीण मराठा समाजाचा दिवसागणिक या आंदोलनाला पाठबळ वाढत आहे. या आंदोलनाच्या सतराव्या दिवशी आज, गुरूवारी कोल्हापूर बंद पुकारण्यात आला आहे. सकल मराठा समाजातर्फे सकाळी अकरा वाजता दसरा चौकात जाहीर सभा होणार आहे. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती असणार आहेत.
सभा सुरू होण्यापूर्वी आॅगस्ट क्रांती दिनानिमित्त ध्वजारोहण केले जाईल. त्यानंतर राष्ट्रगीत, शाहू गौरवगीत, महाराष्ट्र गीत, मराठा आरक्षण गीत होईल. या सभेमध्ये जिल्ह्यासह राज्यातील मान्यवर वक्ते उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी पाचपर्यंत सभा सुरू राहणार आहे.
या सभेसाठी शहरासह आसपासच्या गावांतील मराठा बांधवांनी कुटुंबीयांसह उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या बंदमध्ये सहभागी होवून सभेला उपस्थित राहण्याबाबतचे आवाहन करणारे संदेश बुधवारी दिवसभर व्हॉटस्अॅप, फेसबुक आदी सोशल मिडियावर फिरत होते.एसटी, केएमटीची सुविधा बंदया बंदच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील एस. टी आणि शहरातील केएमटीची सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी मुक्कामी राहणाऱ्या एसटी या बुधवारी रात्री डेपोमध्ये परत येणार आहेत.गुरूवारी सकाळपासून एकही एसटी स्थानकातून बाहेर पडणार नाही. शहरातील सर्व चित्रपटगृहे देखील बंद राहणार आहेत. प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये ही बंद राहतील.