कोल्हापूर : मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थळ असलेल्या हज यात्रेस जाणाऱ्या कोल्हापुरातील मुस्लिम बांधवांनी दसरा चौकात सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी दुवा पठण करण्यात आले; त्यामुळे दसरा चौक मुस्लिम बांधवांनी फुलून गेला. यावेळी ग्रामीण भागातूनही अनेक रॅली ठिय्या आंदोलनात येऊन सहभागी झाल्या. यावेळी मराठा आरक्षण मागणीचा गजर करण्यात आला.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी कोल्हापुरातील दसरा चौकात गेले २0 दिवस सकल मराठा ठोक मोर्चाच्यावतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे. दिवसेंदिवस या आंदोलनाची धग वाढत असतानाच ग्रामीण भागातूनही या आंदोलनास मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे; त्यामुळे ग्रामीण भागातील रॅली भगवे झेंडे घेऊन दसरा चौकात येऊन ठिय्या आंदोलनात सहभागी होत आहेत.मुस्लिम बांधवांचे प्रवित्र स्थळ असणारे हज येथे यात्रेसाठी कोल्हापुरात जाणाऱ्या मुस्लिम बांधवांनी सोमवारी दसरा चौकात एकत्र येऊन मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. तत्पूर्वी मुस्लिम र्बोडिंगमध्ये अल्लाकडे दुवा पठण करण्यात आले.
या हज यात्रेसाठी जाणारे मौलाना मुबीन यांनी ठिय्या आंदोलनाच्या व्यासपीठावर जाऊन, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. तसेच हज यात्रेला गेल्यावर तेथे समोर काब्रा (पवित्र भिंत) दिसल्यानंतर अल्लाकडे दुवा केली जाते. त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशीही दुवा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी प्रशासक कादर मलबारी यांनीही भाषणात व्यक्तकरून मोठ्या भावाप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असेही सांगितले. त्यानंतर पवित्र हज यात्रेसाठी बसमधून रवाना झाले. यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, कोल्हापूर हज कार्पोरेशनचे बाबू मकानदार, हर्षल सुर्वे, वसंतराव मुळीक, आदी उपस्थित होते. यावेळी मुस्लिम समाजातील महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
हसूर दुमाला ग्रामस्थांना खीर वाटपहसूर दुमाला येथील ग्रामस्थांनी चारचाकी वाहनांतून मोठ्या संख्येने रॅलीने दसरा चौकात आंदोलनस्थळी येऊन त्यांनी पाठिंबा दर्शवला. प्रत्येक वाहनांना भगवे झेंडे लावले होते. हसूर दुमालातील सुमारे २४ सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला.
त्यामध्ये मराठा रियासत ग्रुप, महाराष्ट्र युवा मंच, हनुमान तरुण मंडळ, आमदार निवास ग्रुप, शाहू तालीम, शाहू सम्राट मंडळ, बालगोपाल तरुण मंडळ, नवहिंद तरुण मंडळ, शिवशंकर तरुण मंडळ, ओम गणेश तरुण मंडळ, सिद्धेश्वर तरुण मंडळ, एम. एस. बी. ग्रुप, बाबा स्पोर्टस्, नागराज ग्रुप, सहजसेवा मित्र मंडळ, ओम बॉईज, आपलं भजन मंडळ, स्वामी समर्थ सेवा मंडळ, युवा प्रतिष्ठान हसूर, जय मल्हार ग्रुप, सॅटपॅट बॉईज गु्रप, शिवकल्याण राजा ग्रुप, अण्णा भाऊ साठे तरुण मंडळ, स्वामी समर्थ सेवा मंडळ यांचा समावेश होता.
यांचाही सहभागमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ, कोल्हापूर शहरातील संभाजीनगर सकल मराठा समाज, निवृत्त पोलीस कल्याण संस्था, ख्रिस्ती युवा शक्ती, आलास ग्रामपंचायत, आलास गावातील मुस्लिम समाज यांनीही या आंदोलनात सहभाग नोंदवून पाठिंबा दर्शवला.