कोल्हापूर : कोपर्डीतील बलात्काराच्या घटनेचा निषेध, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी, यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापुरात दि. १५ आॅक्टोबरला सकल मराठा समाजातर्फे मराठा क्रांती मूक मोर्चा निघणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्ताचे काटेकोर नियोजन होत आहे. मेळाव्यात सहभागी होणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी वाहनांची पार्किंग व्यवस्था, वाहनांना प्रवेश बंदी, आदी नियोजनाची तयारी सुरू आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी शुक्रवारी दिली. मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात राज्यभर मराठा क्रांती मूक मोर्चे निघत आहेत. त्यामध्ये मराठा समाज सहभागी होऊन रस्त्यावर उतरत आहे. कोल्हापुरातही असा भव्य मोर्चा १५ आॅक्टोबरला निघत आहे. मोर्चामध्ये आयोजकांनी सुमारे १५ लाख नागरिक उपस्थित राहतील, असा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने मोर्चाच्या बंदोबस्ताच्या नियोजनाची तयारी केली आहे. शिस्तबद्ध नियोजन व्हावे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेच्या नियोजनाची तयारी सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी सांगितले.
मराठा आरक्षण मोर्चा बंदोबस्ताची जय्यत तयारी
By admin | Published: September 24, 2016 1:09 AM