कोल्हापूर : बीड, धाराशीव, लातूर , जालना आदी जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनामुळे जिल्हे बंद आहेत. त्यामुळे कोल्हापूर विभागातून नांदेड,लातूर, धाराशीव, अंबेजोगाई, बीड, शिर्डी, आदी मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेसच्या सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी १३९ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचा थेट फटका उत्पन्नावर झाला असून ७ लाख ७७ हजारांचे उत्पन्न घटले आहे.कोल्हापूर विभागातून या जिल्ह्यातील मार्गावर होणारी वाहतुक सेवा सोमवारपासून बंद करण्यात आली आहे. सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून या मार्गावरील बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. विशेषत: आंदोलनाची धग धाराशिव, लातूर, नांदेड, शिर्डी या भागात अधिक आहे.
काल, मंगळवारी (दि. ३१) ला १६० फेऱ्या , तर बुधवारी १३९ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे विभागाचे या मार्गावरील २३ हजार ५८६ किलोमीटर रद्ध झाले. त्याचा थेट फटका उत्पन्नावर बसला असून विभागाचे ७ लाख ७७ हजारांचे नुकसान झाले. अशी माहिती विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.
१२ गुन्हे दाखल, आंदोलकांकडून एसटी लक्ष्य मराठा आरक्षण मागणीच्या आंदोलनाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले असून, कोल्हापूर परिक्षेत्रातही आंदोलन तापले आहे. गेल्या चार दिवसात परिक्षेत्रातील सोलापूर ग्रामीण हद्दीत ११ ठिकाणी एसटींची तोडफोड झाली, तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात एका एसटीची तोडफोड झाली. तोडफोडीच्या सर्व गुन्ह्यांमधील संशयितांची ओळख पटली असून, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.