पाचगाव : गेल्या आठ दिवसांपासून संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मोर्चाच्या ठिय्या आंदोलनाची सरकारने अद्याप दखल घेतली नाही. दिवसेंदिवस आंदोलनाची दाहकता आणखीन वाढत असून, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पाचगाव सकल मराठा क्रांती कृती समितीच्यावतीने गुरुवारी पाचगाव (ता. करवीर)मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी पाचगावमधील सर्व दुकाने व संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. गावातून रॅली काढून दसरा चौक येथे जाऊन आंदोलनात सहभागी होऊन निवेदन दिले.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या न्याय मागणीसाठी मराठा समाजाने आतापर्यंत शांततेच्या मार्गाने ५८ मोर्चे काढून जगासमोर आदर्श ठेवला. तरीही शासनाचे डोळे उघडले नाहीत. मराठा समाजाची सरकार फसवणूक करीत असल्याने आंदोलन अधिकच तीव्र बनत चालले आहे. यालाच पाठिंबा देत संपूर्ण पाचगावमध्ये पूर्णपणे बंद पाळण्यात आला. गावातील व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. यावेळी हातात भगवे झेंडे, डोक्यावर भगव्या टोप्या घालून तरुणांनी गावातून भव्य रॅली काढली. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सुमारे २00 पेक्षा अधिक मोटारसायकलींचा समावेश होता. सकल मराठा समाजाच्यावतीने दसरा चौक येथे सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देऊन रॅलीची सांगता करण्यात आली. दिवसेंदिवस ग्रामीण भागातून या आंदोलनाला पाठिंबा वाढत आहे. या आंदोलनात सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच संग्राम पोवाळकर, सदस्य धनाजी सुर्वे, प्रकाश गाडगीळ, विष्णू डवरी, सुशांत शेटगे, प्रवीण कुंभार, अश्विनी चिले, राधिका खडके, भाग्यश्री दळवी, दीपाली पाटील, स्नेहल शिंदे, मेघा गाडगीळ, संजय पाटील, नारायण गाडगीळ, युवराज पाटील, एम. एस. पाटील, शिवाजी ढेरे, सचिन पाटील, विशाल पाटील, संजय शिंदे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर तालीम संस्था, तरुण मंडळे सहभागी झाली होती.
मराठा आरक्षणप्रश्नी पाचगावात बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 12:32 AM