कोल्हापूर : मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून पन्नास गाड्यांतून दोनशे कार्यकर्ते सोमवारी पोहोचले. या कार्यकर्त्यांनी पोलिसांना चकवा देत छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकाबाहेर निदर्शने करत काहीकाळ ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेऊन रात्री सोडले.सकल मराठा समाजाचे दोनशेहून अधिक कार्यकर्ते मुंबई येथील आझाद मैदानात होणाऱ्या आरक्षणप्रश्नी आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी मुंबईत पोहोचले. तत्पूर्वी पोलिसांनी हे कार्यकर्ते मुंबईत पोहोचण्यापूर्वीच ताब्यात घेण्याची रणनीती आखली होती. मात्र, या कार्यकर्त्यांनी वेगवेगळे गट करत पोलिसांनाही चकवा दिला.
दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दिलीप पाटील, सचिन तोडकर, प्रसाद जाधव, प्रकाश सरनाईक, संतोष कांदेकर, महादेव आयरेकर, रोहन पाटील, शैलैश जाधव, सुनयना साळोखे, धनश्री तोडकर, आदी दोनशेहून अधिक कार्यकर्ते सीएसटी रेल्वे स्थानकाबाहेर पोहोचले.
त्यांनी अचानकपणे स्थानकाबाहेर ठिय्या आंदोलन करत जोरदार निदर्शने केली. त्यानंतर विधानभवनकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुंबई पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन दोन तासांनी सोडले. तत्पूर्वी कोल्हापुरातून रविवारी रात्री विविध वाहनांतून हे दोनशे कार्यकर्ते पोलिसांना चकवा देत सोमवारी दुपारी मुंबईत पोहोचले होते.