कोल्हापूर: मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका पण केंद्र सरकारने केलेली १०२ वी घटनादुरुस्ती अडसर ठरत आहे. कायदेशीर सवलतीसह आरक्षण हवे असल्यास घटना दुरुस्ती करण्यास केंद्र सरकारला भाग पाडावे लागेल, अशी सुचना वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.मराठा आरक्षण लढ्याचे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाचे रणशिंग बुधवारी कोल्हापुरातून फुंकले गेले. यावेळी खासदार संभाजीराजे यांच्यासमवेत आंबेडकर देखील मांडीला मांडी लावून आंदोलनात सहभागी झाले.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच आल्याने ते काय बोलतात याचीच उत्सूकता जास्त होती, पण त्यांनी जाहीर भाषण टाळत केवळ पाठींबा दर्शवत शांत राहणेच पसंद केले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमाशी कांही काळ संवाद साधला असता आरक्षणाबाबतच्या कायदेशीर बाबीबर बोट ठेवले.