कोल्हापूर : सर्वाेच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यभर दौरा करून समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही फोन आला होता. त्यांच्याशी आणि विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी २७ किंवा २८ मे रोजी बैठक होईल. त्यानंतर आरक्षणप्रश्नी पुढील दिशा स्पष्ट केली जाईल, अशी घोषणा खा. संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी बोलताना केली. येथील टाऊन हॉल परिसरातील नर्सरी गार्डनमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळास खा. संभाजीराजे यांनी अभिवादन केले. ते म्हणाले, गायकवाड समितीचा अहवाल फेटाळून लावत सर्वाेच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. त्यानंतर समाजात असंतोष आहे; पण रस्त्यावर उतरून तो व्यक्त करण्याची परिस्थिती सध्या कोरोनामुळे नाही.
संयमाने न्याय मिळविणेच हिताचेमराठा समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी जगाने नोंद घ्यावी, असे ५८ मोर्चे निघाले. आता कोरोनाची महामारी आहे. त्यामुळे संयमाने न्याय मिळविणे समाजाच्या हिताचे आहे, असेही खा. संभाजीराजे यांनी सांगितले.