कोल्हापूर : ‘आता नाही माघार, आरक्षण घेणार’असा ठाम निर्धार करीत शिवाजी पेठेचे भगवे वादळ सोमवारी रस्त्यावर उतरले. भगवे झेंडे फडफडत ‘जय भवानी-जय शिवाजी’चा जयघोष करीत हा एल्गार मोर्चा साऱ्यांचा लक्षवेधी ठरला. मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास शिवाजी पेठेतील सर्व सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी पदाचा राजीनामा देण्याचीही घोषणा यावेळी केली. आरक्षण द्या, अन्यथा पेठेचा हा उद्रेक जिल्हाभरच नव्हे, तर राज्यभर परसेल, असाही इशारा सरकारला दिला.‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’ या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू असताना कोल्हापुरातून शिवाजी पेठेने सोमवारी मोर्चा काढून आपली ताकद दाखवून दिली. सकाळी महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते निवृत्ती चौकातील अर्धा शिवाजी पुतळ्याचे पूजन करून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. मोर्चात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा १५ फुटी अश्वारुढ पुतळा सहभागी होता.
मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मोर्चात ‘जय भवानी-जय शिवाजी’ असा जयघोष करीत ‘मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे...’, ‘आता नाही माघार आरक्षण घेणार’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात दहा महिलांच्या शिष्ठमंडळाने जिल्हाधिकाºयांकडे मागण्यांचे निवेदन सादर केले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्यासपीठावर झालेल्या सभेत महापौर शोभा बोंद्रे, आमदार चंद्रदीप नरके, महेश जाधव, सई खराडे, रविकिरण इंगवले, सुजित चव्हाण, अजित राऊत, माजी आमदार सुरेश साळोखे, आदींची भाषणे झाली. यावेळी नगरसेविका तेजस्विनी सावंत, जयश्री चव्हाण, अजिंक्य चव्हाण, किरण नकाते, माजी नगरसेवक उत्तम कोराणे, इंद्रजित बोंद्रे, दत्ताजी टिपुगडे, अजित चव्हाण, अजित नरके, अॅड. अशोकराव साळोखे, सुरेश जरग, राजू सावंत, बाबा महाडिक, अजय इंगवले, अशोक देसाई, राहुल इंगवले, आकाश नवरुखे, चंदर नवरुखे, गणेश खेडकर, संजय आयरेकर, आदी उपस्थित होते.
बाल शिवाजी, जिजाऊ, वासुदेवमोर्चात बाल शिवाजी, जिजाऊ, बाल संभाजी यांच्या वेशभूषेत लहान मुले घोड्यावर स्वार होऊन मोर्चात सहभागी झाली होती. टाळ व मृदुंगाच्या गजरात वासुदेवाची वेशभूषा केलेले आरक्षणाचा गजर करताना लक्ष वेधत होते. याशिवाय अनेक लहान मुलांनी बाल शिवाजींची वेशभूषा केली होती.