कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगित दिल्याने संतप्त झालेल्या येथील उत्तेश्वर पेठेतील कार्यकर्त्यांनी दंडवत घालत अंबाबाई मंदिराकडे जाण्याचा शुक्रवारी प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी पुढे होत दंडवत घालायला सुरूवात केली. अखेर पोलिसांनी त्यांनाही रोखले. उत्तेश्वर पेठेतच हा शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला.आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर उत्तेश्वर पेठ येथील कार्यकर्त्यांनी उत्तरेश्वर मंदिर ते अंबाबाई मंदिर या मार्गावर दंडवत घालण्याचे आंदोलन जाहीर केले होते. त्यानुसार सकाळी हे आंदोलन सुरूही करण्यात आले. काही अंतर घोषणा देत हे कार्यकर्ते चालत निघाल्यानंतर पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेउन व्हॅनमध्ये बसवले.
यावेळी सोबत असलेल्या शालेय गणेशातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनीही रस्त्यावर दंडवत घालायला सुरूवात केली. अखेर पोलिसांनीच या विद्यार्थ्यांना दंडवत घालणे थांबवायला सांगितले आणि त्यांना उठवले. यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मराठा समाजाला आरक्षण नसल्याने आमच्या समाजातील मुलामुलींना शिक्षण घेणेही अवघड बनले आहे. यासाठीच आम्ही हे आंदोलन करत होतो अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
आंदोलकांवर गुन्हे दाखल करू नयेत -संभाजीराजे छत्रपतीयावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आमच्या भविष्याचे काय? या विध्यार्थ्यांच्या प्रश्नाचे उत्तर सरकारला द्यावेच लागेल, अशी मागणी केली आहे.. समाज माध्यमावरील आंदोलनाचे फोटो ट्विट करून राजेंनी हे छायाचित्र मराठा समाजातील खदखदीचे प्रतिनिधित्व करते, अशी प्रतिक्रिया दिली. समाजाचा आक्रोश बळाचा वापर करुन शमवण्याचा प्रयत्न कराल, तर तो तितकाच तो उफाळून येईल. म्हणून मी सरकारला सांगू इच्छितो की आपण आंदोलकांच्या आक्रोशाचा सन्मान करा. यापूर्वी सुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली आहे की, आंदोलकांवर गुन्हे दाखल करू नयेत, त्यांना नोटिसा देऊ नयेत, हे केल्यास त्याचा उलट परिणाम दिसून येईल, असे संभाजीराजे म्हणाले.