कोल्हापूर : राज्यातील सर्व पक्ष, संघटनांचा पाठिंबा मराठा आरक्षणाला असताना मग प्रश्न का सुटत नाही, असा प्रतिप्रश्न करत खासदार राजू शेट्टी यांनी आता मराठा समाजातील युवकांचा संयम सुटला आहे, त्यासाठी तातडीने सरकारने आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, असे आवाहन केले.ऐतिहासिक दसरा चौकात गेले सात दिवस मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नावर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास खासदार राजू शेट्टी यांनी भेट देऊन या आंदोलनास पाठिंबा दिला.
यावेळी माजी मंत्री जयवंतराव आवळे, माजी आमदार संजय घाटगे, करवीर पंचायत समितीचे सभापती राजू सूर्यवंशी, भगवान काटे, काँग्रेसच्या प्रदेश महिला सरचिटणीस अॅड. सुषमा रोटे, आदींनीही आपल्या भाषणात शासनाला टिकेचे लक्ष बनवले.खासदार शेट्टी म्हणाले, मी फक्त मराठा समाजाच्याच नव्हे तर इतरही समाजाचे प्रश्न संसदेत मांडले. हे प्रश्न शेतकऱ्याचे कुणबी पोरं म्हणून मी मांडले आहेत. संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात शांततेने मोर्चे काढल्यानंतरही शासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे; त्यामुळे युवकांचा संयम सुटणारच.
राज्यात सर्व पक्ष व संघटनांचा पाठिंबा असताना हा प्रश्न का सुटत नाही? असाही प्रश्न उपस्थित करून मराठा समाजातील युवकांनी हा प्रश्न संयमाने हाताळावा व शाहू, फुले, आंबेडकर यांची चळवळ पुढे न्यावी, असेही आवाहन केले.
समाजाला शासनाने फसविले : जयवंतराव आवळेमाजी मंत्री जयवंतराव आवळे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत झोपेचे सोंग करणाऱ्या या भाजप सरकारला जागे करणे अवघड झाले आहे; त्यामुळे हे आंदोलन तीव्र केल्याशिवाय पर्याय नाही. वेगवेगळ्या आयोगांची नावे सांगून मराठा आरक्षणाचा विषय प्रलंबित ठेवून शासनाकडून मराठा समाजाची फसवणूक सुरू आहे. मराठा समाजाची होत निघालेली दुरवस्था पाहता या समाजाची आरक्षणाची मागणी रास्त आहे, असेही ते म्हणाले.
शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा : संजय घाटगेमराठा समाजाला आरक्षणाबाबत आंदोलने करावी लागतात, ही दुर्दैवाची गोष्ट आहे, असे सांगून माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, मराठ्यांचे आंदोलन ही सामूहिक एकी व ताकद आहे, त्यासमोर कोणाचेही चालणार नाही. समाजाला आरक्षण देणे गरजेचे आहे; त्यामुळे शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा.
दहा वर्षे काय केले : आंदोलकाचा शेट्टींना प्रश्नदसरा चौकातील आंदोलनाच्या व्यासपीठावर खासदार राजू शेट्टी बोलण्यास प्रारंभ करतानाच व्यासपीठासमोर उभारलेल्या एका दऱ्याचे वडगाव येथील आंदोलकाने खडा सवाल करून त्यांच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. ‘तुम्हीही दहा वर्षांत लोकसभेत मराठा आरक्षणाबाबत किती आवाज उठवला’ असा प्रश्न करताच एकच गोंधळ उडाला, तातडीने पोलीस व इतर कार्यकर्त्यांनी त्या आंदोलकास बाजूला नेले; पण त्यामुळे काहीवेळ वातावरण तंग बनले होते.