ठळक मुद्दे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, लोकप्रतिनिधींची ग्वाही आरक्षणाचा अन्य मागण्यांबाबत पाठपुरावा करणार
कोल्हापूर: सकल मराठा समाजाने केलेल्या आवाहनानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी बुधवारी सकल मराठा क्रांती मूक मोर्चात सहभागी झाले. त्यांनी मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांच्या पुर्ततेबाबत सरकार दरबारी पाठपुरावा करण्यासह मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
- पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, सकल मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. मराठा समाजाला लवकरात लवकर न्याय देण्यासाठी महाविकास आघाडी सर्वतोपरी प्रयत्न करेल. राज्य सरकार कुठेही कमी पडत नाही.
- ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे.या समाजाला आरक्षणाची गरज आहे. यासमाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेबाबत सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल.
- आमदार राजेश पाटील म्हणाले, विधीमंडळातील सर्व आमदार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करतात
- आमदार विनय कोरे म्हणाले, देशाच्या प्रगतीच्या वेगाची तुलना केली तर कृषी क्षेत्राचा दर दोन टक्के पेक्षा सुद्धा अधिक वाढला नाही. त्यामुळे मराठा समाज पिचला आहे. या समाजाला उभारी देण्यासाठी आरक्षणाशिवाय आणि इतर सवलतींची गरज आहे. यासाठी विधिमंडळामध्ये आणि आवश्यक प्रयत्न करावे लागतील ते अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करू.
- आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, समाजाला आरक्षण देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. न्यायालयीन लढाईसाठी वकिलांची फौज उभी केली जाईल.
- आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे संसदेत या माध्यमातूनच आरक्षण मिळणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मिळवून ताकदीने पाठपुरावा करूया.