कºहाड : मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असताना गुरुवारी पुकारलेल्या बंदला कºहाडसह पाटण तालुक्यातून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. बंदच्या पार्श्वभूमीवर दोन्ही तालुक्यांतील प्रत्येक रस्त्यावर मराठा वादळ पाहावयास मिळाले. प्रत्येक रस्ता आंदोलकांनी रोखून धरला. तसेच ठिकठिकाणी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करीत मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली.
कºहाड शहरात गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. मुख्य बाजारपेठेसह शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही दिवसभर शुकशुकाट होता. सकाळी आंदोलनकर्ते दत्त चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर जमा झाले. त्यांनी ‘एक मराठा, लाख मराठा’ अशी घोषणाबाजी करीत दुचाकी रॅली काढली. रॅलीद्वारे त्यांनी बंदचे आवाहन केले. दत्त चौकातून ही रॅली मुख्य बाजारपेठमार्गे चावडी चौक, कन्या शाळा, कृष्णा नाका, विजय दिवस चौक, बसस्थानकमार्गे पुन्हा दत्त चौकात येऊन तेथून पुढे मलकापूरकडे मार्गस्थ झाली. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापारी, किरकोळ विक्रेत्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवले होते.
दरम्यान, दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी सकाळी मुंडण आंदोलन करण्यात आले. याठिकाणीही आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सामूहिक मुंडण आंदोलनात अनेक आंदोलनकर्ते युवक सहभागी झाले होते. त्यांनी घोषणाबाजी करीत शासनाचा निषेध केला. तसेच मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी घोषणाबाजीही केली. ओगलेवाडी, विमानतळ, मलकापूर, सुपने, आबईचीवाडी, तांबवे, वाठार येथेही आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून मराठा आरक्षणाची मागणी केली.जनावरे बांधली रस्त्यावरगुहाघर-विजापूर महामार्गावर आबईचीवाडी, ता. कºहाड येथेही आंदोलनकर्ते आक्रमक झाले. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आंदोलक जनावरे घेऊन रस्त्यावर उतरले. त्यांनी महामार्गावरच जनावरे बांधून दोन्ही बाजूंची वाहतूक रोखून धरली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलीस त्याठिकाणी पोहोचल्यानंतर आंदोलकांनी जनावरे रस्त्यावरून हटवली.लाल परी आगारात विसावलीमराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन महामंडळाने सर्व एसटी फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे बुधवारी रात्रीच मुक्कामी एसटी कºहाड आगारात पोहोचल्या होत्या. गुरुवारी सकाळी सर्व एसटी आगारात एकाच ठिकाणी उभ्या केल्या होत्या. एसटी बंद असल्याने बसस्थानकात शुकशुकाट जाणवत होता.तासवडे टोलनाक्यावर भजनतासवडे येथील टोलनाक्यावर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर आंदोलनकर्ते जमा झाले. त्यांनी महामार्गावरच ठाण मांडून भजन म्हणण्यास सुरुवात केली. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करीत त्यांनी आरक्षणाची मागणी केली. यावेळी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.दुभाजकाचे दगड टाकून रास्ता रोकोविमानतळ येथेही आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत गुहाघर-विजापूर महामार्ग रोखला. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आंदोलक विमानतळावर जमा झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत रस्त्यानजीक उभे केलेले दुभाजकाचे दगड रस्त्यावर टाकले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली. त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेऊन रस्त्यावरील दगड हटवले.