संतोष मिठारीकोल्हापूर : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने कोल्हापुरात डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह आॅगस्टमध्ये सुरू केले. राज्यातील या पहिल्या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना जेवणाची सुविधा आणि अभ्यासासाठी टेबल, खुर्च्यांची आवश्यकता आहे. या वसतिगृहाचा कोल्हापूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील ६० विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निवासस्थान असलेल्या विचारेमाळ येथील इमारतीची दुरुस्ती करून डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहासाठी इमारत तयार केली. ७२ विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था असलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात झाले.
नोंदणी केलेल्या ७४ विद्यार्थ्यांपैकी सुरुवातीला १० विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्यात आला. आजअखेर वसतिगृहात ६० विद्यार्थी राहत आहेत. त्यांमध्ये कोल्हापूर, सातारा, नांदेड, उस्मानाबाद, नाशिक, आदी जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांना कपाट, पलंग, गरम पाणी, आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या सुविधा आणि व्यवस्थापनाबाबत विद्यार्थ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. वसतिगृहात जेवणाची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना तेथून बाहेर जावे लागत आहे. ते त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे या ठिकाणी जेवणाची सुविधा उपलब्ध व्हावी. अभ्यासासाठी टेबल, खुर्च्या उपलब्ध होणे गरजेचे आहे. याबाबत आम्ही वसतिगृह व्यवस्थापनाकडे मागणी केली असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. वसतिगृहात अजून बारा जागा रिक्त आहेत.
मी पन्हाळा तालुक्यातील असून आयटीआयमध्ये शिक्षण घेत आहे. या वसतिगृहाचा मला चांगला उपयोग झाला आहे. येथील सुविधा, व्यवस्थापन चांगले आहे. जेवणाची व्यवस्थाही वसतिगृहात उपलब्ध झाल्यास ती आम्हा सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे.- शुभम गायकवाड
या वसतिगृहाच्या माध्यमातून शिक्षणासाठी कोल्हापुरात राहण्याची एक चांगली व्यवस्था उपलब्ध झाली आहे. सुरक्षा, नियोजन उत्तम आहे. वसतिगृहात आम्हाला अभ्यासासाठी टेबल आणि खुर्च्या मिळणे गरजेचे आहे.- प्रथमेश पाटील
काही विद्यार्थी सोडून गेलेया वसतिगृहात सुरुवातीला प्रवेशित झालेले काही विद्यार्थी हे कोल्हापुरात भौगोलिक वातावरण मानवले नसल्याने, तर काहीजण त्यांच्या महाविद्यालयाजवळ राहण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने सोडून गेले. त्यांच्या जागी अन्य नवे विद्यार्थी प्रवेशित झाले. वसतिगृहात सध्या असलेल्या ६० विद्यार्थ्यांमधील अखेरचा विद्यार्थी गेल्या आठवड्यात प्रवेशित झाला आहे.