लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर :मराठा आरक्षणासाठी सध्या राज्यकर्ते बैठका घेत आहेत. मात्र, आरक्षणासाठी ५० टक्क्यांची मर्यादा असून, ती वाढवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी या आरक्षणासाठी मुंबईत बैठका न घेता त्या दिल्लीत घेऊन ५० टक्क्यांची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्राला भाग पाडावे, तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त भेटीमुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. हा संशयकल्लोळ त्यांनीच दूर करायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली.
चव्हाण म्हणाले, पवार काका-पुतण्यांच्या भेटीमुळे संभ्रम वाढला आहे, हे खरे आहे. त्यांच्या होणाऱ्या भेटीमुळे संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. या दोघांबरोबर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी यावर स्पष्टीकरण देऊन हा संभ्रम दूर करावा. त्यांच्यातील या भेटीमुळे महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.