कोल्हापूर : ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी’ अशा या ‘माय मराठी’चा अभिमान बाळगत मंगळवारी ‘मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, संस्थांच्यावतीने ग्रंथदिंडीसह सांस्कृतिक व मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.प्रायव्हेट हायस्कूलमध्ये आफिक सय्यद व अबोली भावे या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा दिनाचे महत्त्व विशद केले. संगीत शिक्षक एस. एस. जाधव यांनी गीत सादर केले. प्रमुख पाहुणे प्रभाकर कुलकर्णी यांनी मराठी भाषेचा वापर व महत्त्व स्पष्ट केले. पी. एम. जोशी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मुख्याध्यापिका एस. एस. तारे, उपमुख्याध्यापक बी. बी. पाटील, पर्यवेक्षक ए. व्ही. कुंभार, जिमखाना प्रमुख पी. के. गुळवणी उपस्थित होते.वि. स. खांडेकर प्रशालेत ग्रंथदिंडी काढण्यात आली. अनिल चव्हाण यांच्या हस्ते वि. वा. शिरवाडकरांच्या प्रतिमेचे पूजन झाले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मधुकर भिऊंगडे होते. यावेळी मुलांनी ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकांचा जीवनपट मनोगतातून मांडला. अनिल चव्हाण यांनी मराठी भाषेच्या वाटचालीचा इतिहास मांडला.
विद्यार्थ्यांनी डी. के. रायकरलिखित नाटिका सादर केली. ग्रंथपाल वीराप्पा धनवडे यांनी पुस्तक प्रदर्शनाची मांडणी केली. यावेळी पर्यवेक्षिका नेहा कानकेकर, ‘आंतरभारती’च्या सहसचिव वंदना काशीद, शिक्षिका सुजाता रेळेकर, बाबासाहेब डोणे आदी उपस्थित होते. शिवानी परमणे हिने सूत्रसंचालन केले. प्रांजली कुंभारने आभार मानले.