कोल्हापूर : केवळ खपास वाव आहे म्हणून काही लिहिले नाही़ सामान्य वाचकाच्या दृष्टीने पुस्तक रंजक आहे का, याचा विचार नेहमीच केला़; पण रंजकतेसाठी मूळ कल्पनेला कधीच बगल दिली नाही़ त्यामुळेच विज्ञान-तंत्रज्ञानापासून मानसशास्त्रापर्यंत विविध विषय सहजपणे वाचकांसमोर मांडता आले़ मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी, यासाठी हा मी केलेला एक प्रयत्न आहे़, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबाले यांनी केले़ ‘झपूर्झा’ या गोडबोले आणि नीलांबरी जोशी लिखित पुस्तकाचे प्रकाशन आज, रविवारी येथील शाहू स्मारक येथील मिनी सभागृहात झाले़ यावेळी डॉ़ बी़ एम़ हिर्डेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी आपला साहित्यप्रवास उलगडला़ मनोविकास प्रकाशन, पुणे आणि वर्डपॉवर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ साहित्यक्षेत्रातील प्रवासाविषयी बोलताना गोडबोले म्हणाले, झपाटून काम करण्याचा संस्कार घरातून मिळाला़ केवळ खपास वाव आहे म्हणून या क्षेत्रात आलो नाही़ जी गोष्ट आवडली तीच केली़ संगीत, खगोलशास्त्र, तत्त्वज्ञानासारख्या क्षेत्रांत गोडीने अभ्यास केला़ या क्षेत्रात आनंद शोधण्याचे आणि तो लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले़ मराठी वाचकांना इंग्रजीतील साहित्य आणि पाश्चिमात्य संस्कृती मराठी लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा सगळा खटाटोप केला़ आयटी क्षेत्रातील मोठमोठ्या कंपन्यांत काम करूनही इतर विषयांत लेखन करण्यावर भर दिला़ त्यातूनच किमयागार, मुसाफिरी यांसारखी पुस्तके जन्माला आली़ त्यांना वाचकांनी दिलेल्या प्रतिसादाने भारावून गेलो़ किती पुस्तके खपली यापेक्षा जास्तीत लोकांपर्यंत पोहोचलो याचा आनंद वेगळाच आहे़ प्रत्येकाला अनेक विषयांत आवड असू शकते़ त्यामुळे पालकांनी मुले जर चौकटीच्या बाहेरचा विचार करीत असली, तर ते स्वीकारले पाहिजे, असेही मत गोडबोले यांनी व्यक्त केले़‘झपूर्झा’ मध्ये जगातील प्रतिकूल परिस्थितीमध्येही अनेक पुस्तके लिहिणाऱ्या लेखकांवर लिहिले आहे, असे मत या पुस्तकाच्या लेखिका नीलांबरी जोशी यांनी व्यक्त केले़ यावेळी मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर, वर्ड पॉवर पब्लिकेशनचे शरण बिरादर तसेच वाचक वर्ग मोठ्या संखयेने उपस्थित होता़ ( प्रतिनिधी )
मराठी ज्ञानभाषा व्हावी
By admin | Published: November 17, 2014 12:08 AM