शिरोळ : घालवाड (ता. शिरोळ) येथे शनिवारी (दि. २७) २६वे दक्षिण महाराष्ट्र मराठी साहित्य संमेलन होणार आहे. दोन दिवस होणाऱ्या या संमेलनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, आज गुरुवारी पशुपक्षी व कृषी प्रदर्शन तसेच मोफत आरोग्य व रक्तदान शिबिर पार पडले. शिरोळ तालुक्यातील घालवाड येथे प्रथमच २६वे दक्षिण महाराष्ट्र मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी साडेसात वाजता ग्रंथदिंडी पूजन व मिरवणूक होणार आहे. त्यानंतर संमेलनाच्या मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन अभिनेता सयाजी शिंदे, तर संमेलनाचे अध्यक्ष डॉ. द. ता. भोसले, स्वागताध्यक्ष गुरूप्रसाद रिसबुड यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. संमेलनाची तयारी पूर्ण झालेली आहे. दरम्यान, संमेलनाच्या निमित्ताने आज पशु, पक्षी व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन कृषी संचलनालयाचे तंत्र अधिकारी शंकर माळी यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. व्ही. सी. ढोके, शिवाजी थोरवत, फुलाजीराव सरनोबत, परशुराम माने, अब्दुलअजीज पाथरवट, तानाजी थोरवत उपस्थित होते. आरोग्य व रक्तदान शिबिराचे उद्घाटन वैद्यकीय अधिकारी डॉ. तिडके यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. विश्वास कोळी, श्रीनिवास कुलकर्णी, श्रीदर्शन कंदले, सतीश कुंभार, संग्राम जाधव उपस्थित होते. उद्या, शुक्रवारी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत, अशी माहिती आदर्श कला, क्रीडा मंडळाचे अध्यक्ष स्वरूपसिंह शितोळे यांनी दिली. (प्रतिनिधी)
घालवाड येथे उद्या मराठी साहित्य संमेलन
By admin | Published: December 26, 2014 12:34 AM