‘माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।’ असे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी एका चरणात म्हटले आहे. त्याचे कारणही असेच होते. त्याकाळी धर्मग्रंथ मुख्यत: संस्कृत भाषेत होते आणि ते सर्वसामान्यांना कळत नव्हते. तेव्हा अशावेळी संत ज्ञानेश्वरांनी गीतेचे संस्कृतीमधील सर्व आशय मराठीमध्ये भाषांतरित केले. गीतेचे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, हा त्यांचा उद्देश होता. आपण मराठी भाषेचा गर्व केला पाहिजे. या भाषेवर प्रेम केले पाहिजे. त्याविषयीचे मराठी साहित्य वाचले पाहिजे. त्याचा खऱ्या अर्थाने प्रचार-प्रसार केला पाहिजे. स्वत:च्या भाषेवर लोक किती प्रेम करतात, हे अन्य राज्यांमध्ये ठळकपणे दिसून येते. ही बाब विचार करण्यासारखी आहे. आजघडीला पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल करतात. आम्ही तुमच्या शिक्षणाच्या आड येत नाही, पण आपल्या मुलांनी मराठी भाषेवर प्रेम करावे, यासाठी पालकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
- बाजीराव बळीराम शिंदे, कोल्हापूर