कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात १९७०-७५ च्या काळात बसवण्यात आलेल्या संगमरवरी फरशीमुळे मंदिरातील उष्णता वाढली आहे. त्यावेळी फरशीचे नावीन्य होते, आणि हेरिटेज वास्तूंबद्दल जागरूकताही नव्हती त्यामुळे फारसा विरोध झाला नाही. फरशी बसवल्यानंतर त्याकाळी आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी केलेला विरोध मोडून पडला.
अंबाबाई मंदिरातील संगमरवरी फरशीखाली दगडी फरशी आहे. मंदिराचे मूळ स्वरूप उजेडात आणण्याासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने संगमरवरी फरशी काढण्यासाठीची निविदा प्रसिद्ध केली आहे. फरशी नेमकी कोणत्या अध्यक्षांच्या काळात बसवली गेली याची ठोस माहिती नसली तरी १९७०-७५ च्या काळात हे काम झाल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी डी. डी. शिंदे सरकार यांनी मंदिरात ही फरशी बसवण्याची इच्छा व्यक्त केली व तशी परवानगी घेऊन हे काम झाले.पुढे १९८८ च्या काळात त्यावेळी आर्किटेक्टला शिकत असलेले जीवन बोडके, संजय आवटे यांच्यासह काही विद्यार्थ्यांनी या फरशीला विरोध करून ती काढून टाकावी यासाठी प्रयत्न केले होते. न्यायायलयापर्यंत हे प्रकरण गेले होते. पुढे ते थांबले. आता ३३ वर्षांनंतर या फरशीचा तोटा लक्षात आल्यानंतर त्याच देवस्थान समितीने फरशी काढून टाकण्याचे काम हाती घेतले आहे.
झुंबर, लोखंडी रॉड काढणार
अंबाबाई मंदिरात ठिकठिकाणी झुंबर लावण्यात आले आहेत. हे लावण्यासाठी मोठमोठे लोखंडी रॉड लावावे लागल्याने त्याचा भार मंदिराच्या छतावर पडत आहे. त्यामुळे हे रॉड काढण्याचे कामदेखील आज गुरुवारपासून सुरू करण्यात येणार आहे.