कोल्हापूर : आर्थिक वर्षाच्या अखेरीला आर्थिक गणित जुळवताना जिल्ह्याचे कुबेर असलेल्या कोषागार कार्यालय, जिल्हा नियोजन समिती व बँकांमध्ये बुधवारी एकच धांदल उडाली होती. तीन दिवसांच्या सुटीतही सलग काम केल्यानंतर अखेरच्या दिवशी या कार्यालयांमधील कर्मचारी रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण करण्यात गुंतले होेते.
नवीन वर्ष जानेवारीत सुरू होत असले तरी आर्थिक वर्ष मात्र १ एप्रिल ते ३१ मार्चपर्यंत असते. वर्षभरातील सर्व व्यवहार, ताळेबंद, नफा तोटा, आगामी वर्षातील कामांचे नियोजन या सगळ्या बाबी ३१ मार्चअखेर पूर्ण करून ते शासनाला पाठवावे लागते. त्यामुळे मार्च महिना आला की, पतपुरवठा करणाऱ्या संस्था, राष्ट्रीयीकृत, सहकारी नागरी बँका, जिल्ह्याचे अर्थकारण सांभाळणारी नियोजन समिती व कोषागार या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांमध्ये मोठी धांदल उडते, त्यात बुधवारी ३१ मार्च असल्याने वेळेत काम पूर्ण करण्यासाठी विभागांमध्ये एकच धांदल उडाली आहे.
यंदा कोरोनाच्या संकटानंतर अचानक जिल्हा नियोजन समितीला ३३० कोटींचा निधी मिळाल्याने त्यांना अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यातील विकास कामांचे प्रस्ताव, त्यांना प्रशासकीय मंजुरी व वर्क ऑर्डर या बाबी वेगाने पूर्ण करून घ्याव्या लागल्या आहेत. मंजूर निधी खर्च करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे दोन वर्षांचा कालावधी असला तरी १५ मार्चनंतर १८८ कोटी खर्चाचे आव्हान नियोजनसमोर होते. त्यामुळे समितीने वेगाने प्रस्ताव मागवले असून, त्या फायलींचा निपटारा करण्यासाठी कार्यालयात कर्मचारी तळ ठोकून होते. जिल्हा कोषागार कार्यालयातही वर्षभरातील सर्व आर्थिक व्यवहार, सेल्स टॅक्स, इन्कम टॅक्स, चलन, भरणा आदी कामांमुळे कर्मचारी कार्यालयात कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत बसून होते. बँकांमध्ये पतपुरवठा, ठेवी, कर्जे, व्याज, परतावा, एनपीएमध्ये गेलेली खाती असा सगळा लेखाजोखा मांडला जात होता. त्यामुळे अनेक बँका व कार्यालयांमध्ये नागरिकांच्या सेवांसाठीची जबाबदारी मोजक्या कर्मचाऱ्यांना देऊन अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांनी फायली पूर्ण करण्यात दिवस घालवला.
---
उद्दिष्टपूर्ती आणि नव्या वर्षाचे नियोजन
यंदा कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांना मंदीची झळ सोसावी लागली आहे. त्यामुळे वर्षाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बँकांना तारेवरची कसरत करावी लागली. त्यात थकबाकीमध्येही वाढ झाली आहे. अर्थकारणाशी निगडित सर्वच व्यवसाय, उद्योगधंद्यामध्ये मागील वर्षाचा ताळेबंद, नफा-तोटा, जमा-खर्च यावरून पुढील वर्षाचे उद्दिष्ट ठरवण्यात येत आहे.
---
फोटो नं ३१०३२०२१-कोल-ट्रेझरी ऑफिस
ओळ : कोल्हापुरातील कोषागार कार्यालयात बुधवारी ३१ मार्च या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी वर्षभराचा ताळेबंद व कामकाजाच्या फायली पूर्ण करण्यासाठी कर्मचारी कार्यालयात तळ ठोकून होते. (छाया : नसीर अत्तार)
--