कोल्हापूर : सन २०१४-१५ या आर्थिक वर्षाचा मंगळवार अखेरचा दिवस असल्याने आपले व्यवहार ‘अपडेट’ करण्यासाठी शासकीय कार्यालयांसह सहकारी व राष्ट्रीयीकृत बँका, कोषागार कार्यालये सोमवारी ग्राहकांच्या गर्दीने फुल्ल झाली होती. ही गर्दी मंगळवारीही कायम राहणार असल्याने या सर्व कार्यालयांतील कामकाजाला अक्षरश: लगीनघाईचे स्वरूप आले आहे. बँका आणि कोषागार कार्यालयांतून तर रात्री जागवल्या जात आहेत. दैनंदिन कामकाजाची वेळ संपल्यानंतर मध्यरात्रीपर्यंत थांबून आपल्या हिशेबाच्या आॅनलाईन किर्दी पूर्ण केल्या जात आहेत. ३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस असतो. त्यामुळे या तारखेला रात्री बारा वाजता आपल्या जमा-खर्चासह ताळेबंद तयार करावा लागतो. त्यामुळे शहरातील सर्वच सहकारी तसेच राष्ट्रीयीकृत बँकांतून दैनंदिन कामकाजाने गती घेतली आहे. ग्राहक सेवेमुळे नियोजित वेळेत ही कामे पूर्ण होत नसल्याने सायंकाळी सहानंतर मध्यरात्री बारा ते एक वाजेपर्यंत शटर बंद करून बँकांचे अंतर्गत कामकाज सुरू आहे. गेल्या आठ दिवसांपासून बँक अधिकारी व कर्मचारी रात्री जागवून काम करत आहेत. त्यासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या रजा व सुट्ट्या बंद झाल्या आहेत. आज, मंगळवारी वर्षअखेर असली, तरी नियमित वेळेत बँकांतून देवघेवीचे व्यवहार सुरू राहणार आहेत. आर्थिक व्यवहाराचे मुख्य केंद्र असलेल्या भारतीय स्टेट बँक व कोषागार कार्यालयांतही अशीच धांदल उडाली आहे. शहर तसेच जिल्ह्यातील ग्राहकांचा विक्रीकर, आयकर, एक्साइज कर, एलबीटी, आदी भरण्यासाठी या दोन ठिकाणी गेल्या चार-पाच दिवसांपासून ग्राहकांची गर्दी उसळली आहे. कोषागार कार्यालयात प्रत्येक वर्षी चार ते साडेचार हजार कोटी महसूल जमा होत असतो. आता वर्षअखेर असल्याने हा कर भरून घेण्यासाठी जादा टेबल्स लावण्यात आलेली आहेत. याशिवाय कोषागार कार्यालयाकडे विविध शासकीय कार्यालयांकडून १२५ ते १५० कोटींची बिले मंजुरीसाठी येत असतात. त्याच्यासाठीही स्वतंत्र व्यवस्था केली आहे. स्टेट बँक व बँक आॅफ इंडियाच्या कार्यालयात वेगवेगळी चलने भरण्यासाठी गर्दी झालेली पाहायला मिळते.राष्ट्रीय बॅँकांची थकबाकी वाढतेय जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांनी आपल्या बँकांची थकबाकी कमी करावी, असे आदेश जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्या-त्या व्यवस्थापनांकडून मिळाले होते. त्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी तसे प्रयत्न केले. मात्र, अनेक कर्जदारांनी आपली कर्जे फेडण्यास असमर्थता दाखविली असल्याने या बँकांचा एनपीए समाधानकारक कमी झालेला नाही, याउलट सहकारी नागरी बँका मात्र आपला एनपीए कमी करण्यात आणि तो शून्य टक्क्यांपर्यंत आणण्यात यशस्वी होत असल्याचे पाहायला मिळते.बॅँकांच्या ताळेबंदांवर शेअर मार्केट अबलंबून मार्च एंडिंगनंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बहुतेक सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे ताळेबंद जाहीर होतील. या ताळेबंदाच्या आकडेवारीचा परिणाम शेअर होल्डरवर होत असतो. त्यामुळे गुंतवणूकदारांचे बँकांच्या ताळेबंदाकडे लक्ष लागून राहिले आहे. आॅनलाईन कर भरण्याकडे कलबँका आणि कोषागार कार्यालयात कर भरण्यासाठी लागणाऱ्या ग्राहकांच्या रांगा आणि तेथे जाणारा वेळ लक्षात घेता अनेक ग्राहकांनी आपला कर हा आॅनलाईन भरण्यावर जोर दिला आहे. आॅनलाईन कर भरण्याचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी दिवसेंदिवस अलीकडील काळात हा कल मात्र वाढतो आहे. शासकीय कार्यालयांतही धांदल सर्वच शासकीय कार्यालयांतून ३१ मार्चची धामधूम सुरू आहे. ज्या कार्यालयांना राज्य सरकारकडून निधी मिळतो तो खर्ची टाकण्याचे त्याचबरोबर खर्ची पडलेल्या निधीचा हिशेब ठेवण्याची धांदल सुरू आहे. आरटीओ, एक्साईज, विक्रीकर, महानगरपालिका यांच्याकडे जमा होणारा निधी बॅँकांत भरण्याची घाई सुरू आहे.
लगीनघाई ३१ मार्चची...
By admin | Published: March 31, 2015 12:08 AM