इचलकरंजी : पोलिस खात्याने पोलिस कर्मचाऱ्यांना मार्च एंडिंगचे ‘टार्गेट’ दिले आहे का? असा सवाल करीत शहरातील वाहतुकीच्या समस्या, चौकात उभे राहून टिंगलटवाळी करणाऱ्या टोळ्या, ओपन बार, हातगाड्यांचा त्रास, अशा विविध समस्यांचा पाढाच नागरिकांनी मांडला.इचलकरंजी पोलिस दलाच्यावतीने सोमवारी आयोजित विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या जनता दरबारात उपस्थित नागरिकांनी हे प्रश्न मांडले. यावेळी जिल्हा पोलिसप्रमुख महादेव तांबडे यांची प्रमुख उपस्थिती होती. नागरिकांच्या प्रश्नांना सामोरे जात नांगरे-पाटील यांनी नागरिकांकडून मांडण्यात आलेल्या अडचणी मार्च एंडपर्यंत निर्गत कराव्यात, असे आदेश पोलिस अधिकाऱ्यांना दिले; अन्यथा गय केली जाणार नाही, असा दमही भरला. पोलिस खात्यांतर्गत पोलिस ठाण्यांच्या वार्षिक तपासणीसाठी नांगरे-पाटील इचलकरंजीत आले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशातील पोलिस खाते ‘स्मार्ट’ बनावे, अशा सूचना दिल्या असल्याचे सांगत ‘स्मार्ट’ या शब्दाची व्याख्या सांगितली. त्यामध्ये पोलिस जागरूक असणे, समाजाप्रती संवेदनशील, खात्यासाठी आवश्यक नवनवीन सोयी-सुविधा घेणे. यामध्ये मोबाईल, वाय-फाय, संगणक प्रणाली, सीसीटीव्ही, असे आवश्यक बदल करून घेत पोलिसांनी त्याचा वापर शिकून घ्यावा, अशा सूचना दिल्या असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांनी कडक वडिलांच्या भूमिकेत असावे. सावत्र आईच्या भूमिकेत असू नये. सर्व सामाजिक प्रश्न सुटण्यासाठी नागरिकांनी सहभाग घेणे आवश्यक असल्याची नांगरे-पाटील यांनी अपेक्षा व्यक्त केली.जिल्हा पोलिसप्रमुख तांबडे यांनी लोकसंख्या, वाहनसंख्या वाढल्याने वाहतुकीच्या समस्या वाढल्याचे सांगितले. समस्यांना आळा घालण्यासाठी घरातूनही प्रबोधन होण्याची गरज व्यक्त केली. तर महिला अत्याचाराबाबत बोलताना स्त्रीचे नाते बदलले की ती बदलते, असे न करता सासूने आई व सुनेने मुलगी बनावे. त्यामुळे बरेचसे घरगुती अत्याचाराचे प्रश्न संपुष्टात येतील.स्वागत व प्रास्ताविक अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी केले. नगराध्यक्षा अॅड. अलका स्वामी, पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे, सर्व पोलिस न्$ि$िारीक्षक, पोलिस अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)नागरिकांनी या समस्या मांडल्याशहरात ओपन बारचा प्रश्न गंभीर, हातगाड्यांवर खाण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या पार्किंगचा प्रश्न, चिकन-मटनचा कचरा ओढ्यात टाकला जातो, ओव्हरलोड वाहतूक, असे विविध प्रश्न नागरिकांतून मांडण्यात आले. नांगरे-पाटील यांनी हे प्रश्न आय. जी. स्तरावरील नसल्याचे सांगत स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना समस्या सोडविण्यासाठी सूचना दिल्या.
पोलिसांना मार्च एंडिंगचे ‘टार्गेट’ दिले आहे का ?
By admin | Published: March 20, 2017 11:32 PM