कोल्हापूर : कीर्तनातून गंगागिरी महाराज मठाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लीम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यासंबंधी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ समस्त मुस्लीम समाज मोठ्या संख्येने एकत्र येऊन मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. रामगिरी महाराज यांना तातडीने अटक करा, अशी आग्रही मागणी केली. यासंबंधीचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले. त्यानंतर मोर्चाची सांगता झाली.छत्रपती संभाजीनगर येथील सराला बेट येथील महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लीम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद, द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याच्या आरोपातून समस्त मुस्लिम समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. धार्मिक भावना दुखावल्याने समस्त मुस्लीम समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.मोर्चात शहर, जिल्हयातील मुस्लीम समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. शांतता भंग करणाऱ्यास अटक करा, सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्याला अटक करा, भोंदू रामगिरी महाराज यांच्यावर कडक कारवाई करा, घातक विचार पसरविणाऱ्यास अटक करा, पैगंबरांचा अपमान करणाऱ्यास अटक करा, अशा मागणीचे फलक हातात घेऊन मोर्चात लक्ष वेधण्यात आले.मोर्चातील अबाल, वृद्धासह, युवक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत ठिय्या मारला. त्या महाराज यांच्या वक्तव्याविरोधात घोषणाबाजी केली. मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर अखिल भारतीय मराठा समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, भारती पोवार, राहुल कांबळे, प्रा. सुकुमार कांबळे, डॉ. महेश कांबळे, इरफान कास्मी यांची भाषणे झाली. या सर्वच वक्त्यांनी रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. प्रा. सुकुमार कांबळे, पोवार यांनी केंद्र, राज्य सरकार विविध जातीत जाणीवपूर्वक भांडणे लावत असल्याचा आरोप केला. यामुळेच पैगंबर यांच्याबद्दल चुकीचे बोलणाऱ्यास सरकार पाठीशी घालत आहे. म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही अनेक वक्त्यांनी केली.यावेळी असहर सय्यद, हाफीज उमर मुजावर, समीर उस्ताद, समद काझी, सिद्दकी बागवान, गणी आजरेकर, तौफिक मुल्लाणी, चंद्रकांत यादव आदी उपस्थित होते.
आक्रमक घोषणाबाजीमुळे परिसर दणाणला..मोर्चातील युवक आक्रमकपणे त्या महाराज यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत होती. यामुळे परिसर दणाणून गेला. यावेळी कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात होता. दरम्यान, मोर्चातील गर्दी मोबाइलवर टिपण्यासाठी अनेकांचे हात सरसावले होते. फोटो, व्हिडिओ, फेसबुक लाइव्ह अनेकजण करीत होते.
मोर्चाच्या सांगतेनंतर स्वच्छतामोर्चा संपल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, इतर प्लास्टिकचा कचरा मुस्लीम समाजातील कार्यकर्त्यांनी एकत्र केला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्लॅस्टिकच्या बाटल्या, फलक एकत्र केले.
काही युवक झाडावर चढले..जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभारलेल्या व्यासपीठासमोर रस्त्यावर मुस्लीम समाजाने ठिय्या मारला होता. गर्दीमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाय ठेवण्यासाठीही जागा नव्हती. काही अति उत्साही युवक शेजारच्या झाडाच्या फांदीवर, संरक्षण भिंतीवर चढून भाषण ऐकत होते.