कोल्हापूर : मार्गशीर्ष महिन्यातील गुुरुवारी केल्या जाणाऱ्या श्रीलक्ष्मी व्रताचा आजपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने पूजासाहित्य व फुलांची खरेदी करण्यासाठी महिलांनी बाजारपेठेत गर्दी केली होती.
हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील चार गुरुवारी हे लक्ष्मीव्रत केले जाते. श्री लक्ष्मी, राजा भद्रश्रवा, सुरतचंद्रिका राणी आणि शामबाला या पौराणिक कथेच्या संदर्भास अनुसरून ही पूजा केली जाते. एका कलशात पाच फळझाडांच्या डहाळ्या ठेवून त्यावर नारळाची श्री लक्ष्मीदेवी म्हणून प्रतिष्ठापना केली जाते. व्रतकथेचे वाचन करून देवीची आरती केली जाते. महिला दिवसभर व्रतस्थ राहतात. सायंकाळी गोडाधोडाचा नैवेद्य करून उपवास सोडला जातो. यानिमित्त पाच फळे, केळी, पाच झाडांच्या डहाळ्या, पान, सुपारी, नारळ, धूप, उदबत्ती यांसह झेंडू व गलाट्याच्या फुलांच्या खरेदीसाठी महिलांनी महाद्वार रोड, भाऊसिंगजी रोड, जोतिबा रोड, मिरजकर तिकटी, टिंबर मार्केट, राजारामपुरी येथील बाजारपेठांत गर्दी केली होती.
--
इंदुमती गणेश