कोल्हापूर : आॅनलाईन शेतमाल विक्रीसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या केंद्र शासनाच्या ‘ई-नाम’ योजनेचे धडे कोल्हापुरातील शेतकरी, व्यापारी, अडत्यांनी गिरविले. कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी दुपारी झालेल्या या प्रशिक्षणात बाजार आवारात शेतमाल आल्यापासून त्याची निर्गत होईपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याची सविस्तर माहिती देण्यात आली.
शेतमालाला योग्य भाव, त्याचे वर्गीकरण, योग्य हाताळणी, मालाचे वजन, विक्री झालेल्या मालाचे पैसे तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणे, आदी उद्देश समोर ठेवून देशभर ई-नाम प्रणालीचा अवलंब केला जात आहे. ज्या बाजार समित्या याचा अवलंब करणार नाहीत, त्या कायमस्वरूपी बंद करण्याबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करीत आहे, असे खुद्द केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मागील आठवड्यातच जाहीर केले आहे. या इशा-यामुळे ई-नाम प्रणाली अधिक काटेकोरपणे राबविण्याबाबतच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
कोल्हापुरातही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी दुपारी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात अश्विन नलगेवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी ‘ई-नाम’चे फायदे सांगताना याची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यास कारभार अधिक पारदर्शक आणि गतिमान होणार असल्याचे सांगितले. यातून रोजचे व्यवहारही सुरळीत होणार आहेत, असेही सांगितले.
सभापती बाबासो लाड, उपसभापती संगीता पाटील यांच्यासह संचालक कृष्णात पाटील, सर्जेराव पाटील, परशराम खुडे, विलास साठे, उदय पाटील, दशरथ माने, शारदा पाटील, आशालता पाटील, अमित कांबळे, उत्तम धुमाळ, शेखर येडगे, संजय जाधव, शशिकांत आडनाईक, सदानंद कोरगावकर, नंदकुमार वळंजू, भगवान काटे, बाबूराव खोत, नेताजी पाटील, संजय साने, नाथाजी पाटील, किरण पाटील, पणन मंडळाचे उपसव्यवस्थापक सुभाष घुले, अनिल पोवार, सचिन मोहन सालपे, ‘रामेती’चे उपसंचालक एन. एस. परीट, उपसचिव तानाजी मोरे उपस्थित होते.