कोल्हापूर : खरेदीदारांच्या संपामुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी बाजार समितीच्या पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शहरातील भाजीपाला मंडईत विक्री केंद्रे सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. खरेदीदार अडत देणार नाही, यावरच ठाम असल्याने पेच अद्याप सुटलेला नसल्याने शुक्रवारी बहुतांशी मार्केटमध्ये शांतताच होती. सहा महिन्यांपूर्वी राज्य सरकारने भाजीपाला नियंत्रणमुक्त करीत सहा टक्के अडत शेतकऱ्यांऐवजी खरेदीदारांकडून वसूल करण्याचे आदेश बाजार समितीला दिले. त्यानुसार गेले सहा महिने खरेदीदार अडत देत होते; पण परवडत नसल्याचे कारण पुढे करीत खरेदीदारांनी अडत देण्यास विरोध सुरू केला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही मार्ग निघत नसल्याने बुधवारपासून त्यांनी खरेदी-विक्रीच बंद केल्याने पेच निर्माण झाला आहे. शुक्रवारी फळे व भाजीपाला मार्केटला सुटी होती. शनिवारपासून मार्केट पूर्ववत करण्यासाठी समिती प्रशासनाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. सौदे बंद केल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. समितीत भाजीपाल्याचे व्यवहार सुरू असून, ज्यांना गरज असेल त्यांनी समितीमधून फळे व भाजीपाला विभागातून खरेदी करावा. जिल्हा व शहरातील सर्व नागरिकांना किरकोळ भाजीपाला खरेदी करण्यासाठी समिती आवारात असलेली किरकोळ भाजी मंडई सुरू आहे. त्याठिकाणी भाजीपाला खरेदी करावा, असे आवाहन सभापती सर्जेराव पाटील-गवशीकर यांनी केले आहे. दरम्यान, शहरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांच्या परवानगीने व महापालिकेच्या सहमतीने मंडईत विक्री केंद्रे सुरू करण्याच्या हालचाली समिती प्रशासनाने सुरू केल्या आहेत. दरम्यान, खरेदीदार संघटनेचे राजू जाधव यांनी लक्ष्मीपुरी मंडईत जाऊन निदर्शने केली. काटे यांनी शुक्रवारी सकाळी ऋणमुक्तेश्वर मंडईला भेट देऊन पाहणी केली. सायंकाळी रेल्वे स्टेशनशेजारील मंडईत जाऊन शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. शेतकऱ्यांना रोखले तर याद राखा : काटेशहरात भाजी विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना काहीजण मज्जाव केल्याच्या तक्रारी येत आहेत. शेतकऱ्यांना विक्रीसाठी रोखले तर ‘जशाच तसे’ उत्तर देऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी दिला. जर कोणी दमदाटी केली तर संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी रमेश भोजकर, भीमगोंडा पाटील, सुरेश पाटील, आदी उपस्थित होते. आठवडी बाजारही ओस !करवीर, कागल, पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी तालुक्यांतील आठवडी बाजारातील किरकोळ खरेदीदार संपात सहभागी आहेत. त्यामुळे हे बाजारही ओस पडू लागले आहेत. मिनी मार्केट आज सुरू राहणारबाजार समितीच्या आवारातील मिनी मार्केटमधील व्यापारीही संपात सहभागी झाले आहेत; पण आज, शुक्रवारी या व्यापाऱ्यांना बोलावून विक्री सुरू करण्याची सूचना समिती प्रशासनाने दिली. बांधावरील भाजीपाला तेजीत!शहरातील मंडई बंद असल्याने शेजारील गावातून येणाऱ्या भाजीपाल्याला चांगला दर मिळत आहे. गंगावेश, कपिलतीर्थ यासह विविध ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी शेतकरी मोठ्या संख्येने येतात.
बाजार समितीची थेट विक्री केंद्रे
By admin | Published: March 04, 2017 12:26 AM