कोल्हापूर : ‘तिळगुळ घ्या, गोड बोला’चा संदेश देऊन मना-मनात गोडवा निर्माण करणाऱ्या मकरसंक्रांतीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. गेल्या दहा महिन्यात कोरोनाच्या भीतीविना साजरा होणारा हा नव्या वर्षातील पहिला सण असणार आहे. त्यामुळे या सणाचा यंदाचा आनंद दि्वगुणित करणारा आहे.
थंडीची दुलई बाजूला सारून उन्हाळ्याची चाहूल देणारा मकरसंक्रांतीचा सण दोन दिवस साजरा होतो. भोगीला देवतांना मिश्रभाज्या, राळ्याचा भात, बाजरीची भाकरी असा नैवेद्य दाखवला जातो, तर मकरसंक्रांतीला सुवासिनी औंसा पूजन करतात. यादिवशी पुरणपोळीचा अथवा शेंगदाण्याच्या पोळीसह पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवला जातो. सायंकाळी तिळगुळ सर्वांना देऊन ‘तिळगुळ घ्या गोड बोला’ असे उच्चारले जाते. यामागे प्रत्येकाच्या जीवनात तिळगुळाचा गोडवा यावा, अशीच भावना असते.
यंदा बुधवारी (दि. १३) भोगी, गुरुवारी (दि. १४) मकरसंक्रांत आणि शुक्रवारी किंक्रांत आहे. सणाला आता दोनच दिवस राहिल्याने बाजारपेठेत बोरं, गाजरे, ऊस, तिळगुळ अशा साहित्याची मोठी आवक झाली आहे. कुंभार वाड्यांमध्ये सुगड विक्रीस ठेवण्यात आले आहेत. एरवी सणाला काळे कपडे घालणे निषिद्ध मानले जाते. पण मकरसंक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळे कपडे परिधान केले जातात. त्यामुळे महाद्वार रोड, राजारामपुरी यासह शहरातील कपडयांच्या शोरूममध्ये व दुकानांच्या दर्शनी भागात काळे कपडे लावण्यात आले आहेत. त्यात लहान मुलींचे फ्रॉक, मोठ्यांसाठी टॉप्स, साड्या, मुलांचे शर्ट, टीशर्ट अशा कपड्यांचा समावेश आहे.
--
फोटो स्वतंत्र