कबनूर : 'ब्रेक द चेन'मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा असताना येथील ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले. त्यामुळे दत्तनगर भागात सकाळी चक्क आठवडा बाजार भरला.
सकाळी आठच्या सुमारास हा आठवडी बाजार पूर्ण क्षमतेने भरला. त्यावेळी बऱ्याच नागरिकांना आश्चर्य वाटले. काहींनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी येऊन बाजार उठविण्याचा प्रयत्न करत होते. तथापि व्यावसायिक त्यांना जुमानत नव्हते. मात्र, उपसरपंच सुधीर पाटील आल्यानंतर त्यांनी कडक भूमिका घेऊन साहित्य जप्त करण्याची कारवाई सुरू केल्यानंतर व्यावसायिकांनी काढता पाय घेतला. बाजार पूर्णपणे उठला. राज्यात दोन आठवड्यांचा 'ब्रेक द चेन' असताना शासनाचे नियम डावलून बाजार भरविणाऱ्या व्यावसायिकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.